पोपटपंचीला जनता भुलणार नाही उदयनराजे : सरकारच्या धोरणांचा घेतला समाचार - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, March 28, 2019

पोपटपंचीला जनता भुलणार नाही उदयनराजे : सरकारच्या धोरणांचा घेतला समाचार


केवळ यात्रेलाच गावाकडे येणा-यांना जनता भुलणार नाही
सातारा : कोणावर अन्याय होत असेल तर तो खपवून घ्यायचा नाही, ही आमच्या घराण्याची परंपरा आहे. लोकांच्या अडचणीच्या वेळी मदतीला धावून जाणे हे आम्हीं कर्तव्य समजतो. याला कोणी दहशत म्हणत असेल तर त्यांच्या बुद्धीची किव करावीशी वाटते, असा शाब्दीक हल्ला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार श्री. . उदयनराजे भोसले यांनी चढवला.
केवळ यात्रा-जत्रेलाच गावाकडे येणा-या यात्रेकरुंना जीपीआरएस शिवाय येथील रस्ते सापडत नाहीत. अशांच्या पोपटपंचीला जनता भुलणार नाही,’ असा विश्वासही उदयनराजे यांनी व्यक्त केला.

कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील बुथ कमिटीचा मेळावा मसूर (ता. कराड) येथे झाला. त्यामध्ये ते बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हापरिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, सारंग पाटील, पंचायत समिती सदस्य देवराज पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, चंद्रकांत जाधव आदी प्रमुख उपस्थित होते.

उदयनराजे म्हणाले, ‘‘पाच वर्षांपूर्वी भरपूर आश्‍वासने देऊन सत्तेवर आलेल्या सरकारने लोकांना अधिक गाळात घालण्याचे काम केले. प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये, दोन कोटी बेरोजगारांना नोकऱ्या असल्या कधीच प्रत्यक्षात येऊ न शकणाऱ्या गोष्टी ‘मन की बात’ म्हणून सांगितल्या गेल्या. ‘वन नेशन वन टॅक्स’च्या नावाखाली जीएसटी आणला गेला. परंतू या जीएसटीने उद्योग-व्यापारी, लहान-मोठे व्यावसायिक यांचा गळा घोटला. आज देश आर्थिक अस्थिरतेच्या उंबरठ्यावर आहे. बेरोजगारीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. ताज्या आकडेवारीनुसार देशातील बेरोजगारांचे प्रमाण २०१८ च्या तुलनेत वाढलेले दिसते. युवकांना रोजगार, नोकऱ्या देणे तर दूरची गोष्ट या सरकारच्या धोरणांमुळे बेरोजगारी वाढविण्याचे काम केले. देशातील हा बेरोजगारीचा वाढता दर गेल्या ४० वर्षांतील निच्चांकी आहे, हे माझं मत नाही नॅशनल स्टॅटिस्टिकल सॅम्पल ऑर्गनायझेशनचा अहवाल सांगतो.’’


"काही लोक या यात्रेला आल्यानंतर पुढच्या यात्रेलाच गावाकडे येतात. इथले रस्ते माहित नसल्याने त्यांना 'जीपीएस'ची मदत घ्यावी लागते. नेटवर्क आहे तिथपर्यंतच यांची सिस्टीम चालते. नंतर सगळं दिशाहिन होऊन सगळी प्रगती ठप्प होते. ही अधोगतीकडील वाटचाल आपल्याला थांबवायची आहे. राजकीय वाऱ्याचा अंदाज घेऊन पक्ष बदलण्याचा तुमचा वेग लक्षात घेता उद्या कोणत्या पक्षात असाल हे सांगता येणार नाही. मग जनतेची सेवा तुम्ही कोणाच्या माध्यमातून करणार, असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला.
नोट बंदीने काळा पैसा तर देशात आला नाहीच. परंतू या देशातील उद्योजकांपासून गोरगरीब जनतेची आडवणूक करण्याचे काम केले. आज देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. या देशातील लोकशाही संपूष्टात येऊन हूकूमशाहीकडे वाटचाल होताना दिसते. मतदान करताना एक चूक केली तर काय होते ते आपण पहात आहोत. चुकीची धोरणं राबवून तळागाळातील जनतेला अधिक गाळात घालण्याचं काम या सरकारनं केले. भावी पिढीचे नुकसान केले. लोक 'मन की बात'ला बळी पडले. लोकांच्या पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे देशात आता परिवर्तन अटळ आहे. उद्याच्या निवडणूकीकडे केवळ निवडणूक म्हणून न पहाता एक चळवळ म्हणून बघावे. आणि गोरगरिबांना आर्थिक विवंचनेला लावणारे सरकार उलथून टाकण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन उदयनराजे भोसले यांनी केले.

कर्जबाजारीपणा, आत्महत्यांचे वाढते प्रमाण आणि शेतमालाला पुरेशी किंमत न मिळाल्याने या देशातील बळीराजावर कुऱ्हाड कोसळली आहे. देश आज आर्थिक गर्तेत अडकला आहे. एका लोकसभा मतदार संघातील निवडणूकीचा सरकारी खर्च १७ कोटी रुपये इतका येतो. देशभरातील ५४३ मतदारसंघावर खर्च होणारा पैसा लोकहिताच्या कामांवर खर्च करावा. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बिनविरोध करून ही निवडणूक टाळावी, असे आवाहनही त्यांनी सरकारला केले.
सुनील माने म्हणाले, "आपले काम प्रभावीपणे होईल याची काळजी प्रत्येक कमिटी मेंबरने घ्यायची आहे. समाज माध्यमातून सत्ताधारी खोटा प्रचार करण्याची शक्यता आहे. आपला पक्ष व पक्षनेत्यांची धोरणं जनतेपर्यंत नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे."

कराड उत्तरमधील कार्यकर्ते एकजुटीने या निवडणूकीत काम करून पक्षाची ताकद दाखवतील, असा विश्वास आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment