सातारा : खटाव येथील शहाजीराजे महाविद्यालयातील प्राध्यापक पदोन्नतीच्या कामासाठी तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणात संस्थेचे अध्यक्ष अन ग्रंथालय परिचर अशा दोन लोकसेवकांनाही ताब्यात घेण्यात आले.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शहाजीराजे महाविद्यालय, खटाव येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना प्राध्यापक पदावर पदोन्नती देण्यासाठी समितीचे अध्यक्ष म्हणून शिवाजी विद्यापीठात उपस्थित राहणे किंवा प्रतिनिधी नियुक्तीचे पत्र देण्यासाठी रविंद्र गणपत पवार (रा. खटाव) या खाजगी इसमाने तीन लाख रुपयांची लाच मागितली. ही रक्कम चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्था, खटावचे अध्यक्ष अजित रामचंद्र पाटील यांच्यासाठी मागितल्याचे सांगण्यात आले. या मागणीस ग्रंथालय परिचर अनिल सदाशिव गुजर यांनीही प्रोत्साहन दिल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले.
यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. मंगळवारी पवार यांनी तीन लाख रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईनंतर अजित पाटील अन अनिल गुजर यांनाही ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुप्रिया गावडे, पोलीस हवालदार गणेश ताटे, निलेश राजपूरे, महिला पोलीस नाईक प्रियंका जाधव अन पोलीस कॉन्स्टेबल अजयराज देशमुख यांच्या पथकाने केली. या कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक राजेश वसंत वाघमारे यांनी केले. मार्गदर्शन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अन अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांनी केले.
0 Comments