महाबळेश्वर:- महाबळेश्वर मधील ऐतिहासिक व पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या द क्लब महाबळेश्वर परिसरात कथित बेकायदेशीर वृक्षतोड केल्याप्रकरणी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन व संवर्धन अधिनियम १९७५ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील संबंधित कलमान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
महाबळेश्वर नगरपालिका वृक्ष अधिकारी श्री. कल्याण बाजीराव हिवरे (वय ५२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, द क्लब महाबळेश्वर परिसरातील गट क्रमांक ११७ व ११८ येथे विनापरवाना व बेकायदेशीररित्या वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात द क्लब महाबळेश्वरच्या अध्यक्षा श्रीमती मनीषा गोखले शहा (वय ६५), सचिव लेफ्टनंट कर्नल गौतम नंदी (निवृत्त) (वय ६२) आणि मेढा येथील ठेकेदार श्री. सुहास पार्टे (वय ४०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर वृक्षतोड २० मे २०२५ ते ११ जून २०२६ या कालावधीत झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन व संवर्धन अधिनियम, १९७५ चे कलम २१(१)(२), ११ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२४(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास महाबळेश्वर पोलिस ठाण्याकडून सुरू आहे.
विशेष म्हणजे, महाबळेश्वरमधील पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वाच्या भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर येत होत्या. आता प्रत्यक्ष गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाकडे पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे. तपासादरम्यान वृक्षतोडीसाठी आवश्यक शासकीय परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, तसेच संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका काय होती, याचाही उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाबळेश्वरसारख्या पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात वृक्षतोडीचे प्रकार समोर येत असल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा.अवघडे करीत आहेत.पुढील चौकशीत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे.
0 Comments