सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: रहिमपूर येथे दि. 4 मे ते 6 मे अशी संपूर्ण टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. मात्र, ही टाळेबंदी आपण केलीच नसल्याचा खुलासा नगरपालिकेकडून करण्यात आला असून मग, ती केली कोणी असा प्रश्न निर्माण झाला असून शहरातील अनेक बँका, आस्थापनांना नगरपालिकेच्या लेटरपॅडवर विनास्वाक्षरीची पत्रेही त्यासाठी पाठवण्यात आली होती, ती पाठवली कुणी? असा सवालही उपस्थित केला जात आहे.याबाबत माहिती अशी, कोरोना पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनचे पालन सुरु असताना काही गावे जनता कर्फ्यूप्रमाणे गाव बंद ठेवण्याचे धोरण स्वीकारीत आहेत. त्यानुसार रहिमतपूरमध्ये दि. 4 मे ते दि. 6 मे पर्यंत संपूर्ण टाळेबंदी करण्यात आली होती. या कालावधीत शहरातील सर्व दुकाने, बँका बंद ठेवण्यात आल्या होत्या.
शहरातील काही बँकांना नगरपालिकेच्या लेटरपॅडवर केवळ शिक्का मारलेली व स्वाक्षरी नसलेली पत्रे रवाना करण्यात आली होती. या पत्रात गावातील दवाखाने व औषध दुकाने वगळता सर्व आस्थापना बंद राहणार असून गावात कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे वरील कालावधीत टाळेबंदी करून सहकार्य करावे, असे नमूद करण्यात आले होते.
याबाबत शंका आल्याने तेथील सामाजिक कार्यकर्ते अॅड. अधीराज धैर्यशील माने यांनी पत्राद्वारे नगरपालिकेकडून खुलासा मागवला होता. त्यावर नगरपालिकेने या कालावधीत अत्यावश्यक आस्थापना व रस्ते बंद ठेवण्याचे कोणतेही आदेश नगरपालिकेकडून निर्गमीत करण्यात आले नव्हते, असा खुलासा मुख्याधिकार्यांच्या सहीने करण्यात आला आहे.
त्यामुळे आता मग रहिमतपुरात तीन दिवस करण्यात आलेली टाळेबंदी केली कोणी? असा प्रश्न निर्माण झाला असून नगरपालिकेच्या नावाने कोणी बोगस लेटरपॅड छापून संबंधित आस्थापनांना पाठवली नाहीत ना? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. नगरपालिकेनेही या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज यानिमित्ताने निर्माण झाली आहे.
याबाबत मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
जिल्हाधिकार्यांशिवाय अशी टाळेबंदी करण्याचे अधिकार कोणालाही नाहीत. यापूर्वीही कराड, मलकापूर नगरपंचायतींनी अशी घोषणा करण्याचा प्रकार केला असता जिल्हाधिकार्यांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. आता रहिमतपुरातील प्रकरणावर जिल्हाधिकारी काय भूमिका घेणार? ते या प्रकरणाची चौकशी करून यातील सत्य बाहेर आणणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.



0 Comments