Hot Posts

6/recent/ticker-posts

गोरेगांव भ्रष्टाचार चौकशीसाठी शोले स्टाईल आंदोलन

वडूज : शोले स्टाईल आंदोलन करणार्‍या कार्यकत्यांना ताब्यात घेताना सपोनी मालोजी देशमुख व सहकारी.
 

 वडूज/प्रतिनिधी : गोरेगांव (निमसोड) ता. खटाव येथील कृषी विभाग व बांधकाम विभागाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीकरीता गावातील प्रमुख कार्यकत्यांनी वडूज येथील पाण्याच्या टाकीवर जावून शोले स्टाईल आंदोलन केले. सपोनि मालोजी देशमुख, गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी आंदोलन स्थळी जावून त्यांची मनधरणी करत प्रतिबंधात्मक उपाययोजना केली.
    याबाबत अधिक माहिती अशी, गोरेगांव येथील ग्रामपंचायतीच्या विद्यमान पदाधिकार्‍यांनी प्रशासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांना हाताशी धरुन कृषी खाते तसेच बांधकाम खात्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. कृषी विभागाने गरजू लाभार्थ्यांना डावलून सक्षम लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ दिला आहे. या लोकांनी शासकीय अनुदानातून मिळालेल्या साहित्याची परस्पर विक्री केली आहे. सरपंच पाणलोटचे अध्यक्ष असताना त्यांनी स्वत:ची वाहने वापरुन अंतर्गत पाईपलाईन व इतर कामात लाभ घेतला आहे. तसेच सरपंचांनी अंबवडे-गोरेगांव रस्त्याच्या कामासाठी पदाचा गैरवापर करुन वनविभागाच्या हद्दीतील मुरमाची ठेकेदारास बेकायदेशी विक्री केली आहे. याशिवाय चौदाव्या वित्त आयोगातील निधीतून मोठ्या प्रमाणावर बोगस कामे करुन निधी लाटण्याचा प्रयत्न केला आहे. या मागणीसंदर्भात अनेकवेळा निवेदन देवूनसुध्दा कारवाई होत नसलेच्या निषेधार्थ युवा कार्यकर्ते विक्रम डोईफोडे, विठ्ठल नलवडे यांनी पाण्याच्या टाकीवर जावून हातात रॉकेलचे डबे घेवून शोले स्टाईल आंदोलन केले. रात्री ऊशिरापर्यंत प्रशासकीय अधिकार्‍यांनी बैठक घेवूनसुध्दा आंदोलकांनी गणीमी कावा केल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.

Post a Comment

0 Comments