Hot Posts

6/recent/ticker-posts

फलटण, कराडसह पाच पालिका निवडणुकांचे बिगूल


18 ऑगस्टला मतदान, 19 रोजी मतमोजणी

राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. जिल्ह्यातील 5 नगरपालिकांसाठी 18 ऑगस्टला मतदान होणार आहे.
 ब वर्गातील कराड,  फलटण, तर क वर्गातील म्हसवड, रहिमतपूर,  वाई नगरपालिकेचा यामध्ये समावेश आहे. पालिका निवडणुकांचा बिगूल वाजल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. कोरोना कालावधीमुळे पहिल्या पदाधिकार्‍यांची मुदत संपल्यानंतर या सर्व पालिकांवर मुख्याधिकारी प्रशासक म्हणून काम करत आहेत.
 22 जुलै ते 28 जुलै पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. 29 जुलैला अर्ज छाननी होणार असून 4 ऑगस्टपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तर 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून 19 ऑगस्टला निकाल जाहीर केला जाणार आहे. यापूर्वी या सर्व पालिकांमध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट झाली होती. यामध्ये कराड येथे भाजपचा, म्हसवड येथे शेखर गोरे गटाचा तर वाई, फलटण, रहिमतपूर येथे राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष निवडून आला होता.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील पर्जन्यमान कमी असलेल्या नगरपरिषदा व  नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील पाच नगरपालिकांचा समावेश झाला आहे. त्यामुळे उर्वरीत सातारा, पाचगणी, महाबळेश्‍वर पालिकांच्या निवडणुका या दुसर्‍या टप्प्यात होणार आहेत.
या सर्व पालिकांची प्रभागरचना नव्यानेच करण्यात आली असून आरक्षण सोडतही जाहीर झाली आहे. या सर्व पालिकांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याने खुल्या प्रवर्गासाठी चुरस वाढली आहे. पूर्वी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना होण्याची शक्यता असताना नुकतेच सरकार बदलल्याने शिवसेना शिंदे गट-भाजप विरुद्ध उर्वरीत शिवसेनेसह महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे.

Post a Comment

0 Comments