माण तालुक्यातील घटना, आरोग्य सेवेतील हलगर्जीपणा चव्हाट्यावर
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
गोंदवले: प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला आरोग्य सेवा लवकर उपलब्ध न होता तडफडत आरोग्य केंद्राच्या बाहेर प्रसूत होण्याची वेळ आली अन लहान बाळही दगावल्याची घटना माण तालुक्यातील म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली. या घटनेने आरोग्य सेवेतील फोलपणा चव्हाट्यावर आला असून मध्यरात्री गैरहजर असणार्या वैद्यकीय अधिकारी अन कर्मचारी यांच्यावर संबंधित आरोग्य विभाग काय कारवाई करणार, असा संतप्त सवाल माण तालुक्यातून व्यक्त होत आहे. विशेषमध्ये सदरची महिला शासनाशी संलग्न सेवेत कार्यरत असून तिच्याच बाबतीत असा प्रकार घडला असेल तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल याबाबत कल्पनाच न केलेली बरी, अशा प्रतिक्रियाही उमटत आहेत.
याबाबत माहिती अशी, गोंदवले खुर्द ता माण येथील रेश्मा गणेश वायदंडे ही सर्वसामान्य कुटुंबातील महिला अशा स्वयंसेविका म्हणून गोंदवले खुर्द मध्ये कार्यरत आहेत तर त्यांचे पती गणेश वायदंडे हे मजुरी आणि खासगी वाहनावर चालकाचे काम करतात. रेश्मा वायदंडे यांचा या पूर्वी दोन वेळा अचानकपणे गर्भपात झालेला होता म्हणून सध्या त्यानी अतिशय काळजीपूर्वक गरोदरपणातील सर्व उपचार म्हसवड येथील डॉ तिवाटने यांच्या हॉस्पिटलमध्ये घेतले होते. त्या सात महिन्याच्या गरोदर होत्या बुधवारी मध्यरात्री पासून त्यांच्या पोटात कळा येण्यास सुरुवात झाल्याने त्यांना रात्री 2 वाजण्याच्या सुमारास म्हसवड येथे दाखल झाले आणि सर्व चाचण्या करण्यात आल्या नंतर डॉ तिवाटने यांनी पुढील सोपस्कार पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे खूप खर्च येईल असे सांगितले यामुळे खर्च परवडणार नाही म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले. यावेळी सदर महिलेची घालमेल सुरू होती महिला खूप ओरडत होती या ठिकाणी येवून एक तास झाला तरी एक ही कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाले नव्हते कर्मचारी निवासस्थानी जाऊन महिलेचा पती जोरजोरात ओरडत होता तरी देखील कोण ही झोपेतून जागे झाले नाही शेवटी 108 वर फोन लावून ती रुग्णवाहिका बोलावली आणि यातच अखेर ती महिला आरोग्य केंद्राच्या आवरात मातीतच प्रसूत झाली त्या रुग्णवाहिकेतील डॉ,. माने यांनी पेशंटची अवस्था पाहिली पण कुठं न्यायचा हा प्रश्न होता ? तालुका वैद्यकीय अधिकारी यांना संपर्क साधला त्यांनी तात्काळ संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रात ड्युटी असणार्या अधिकार्यांना फोन करून संबंधित माहिती दिल्यावर डॉक्टर आणि एक अधिपरिचरिका तिथं दाखल झाल्या अन नंतर त्याना हॉस्पिटलमध्ये दाखल करून प्राथमिक उपचार करत पुढील उपचारासाठी सातारा येथे दाखल करण्यास सांगितले.
म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्र हे सातारा लातूर या मुख्य रस्त्यावर असून अनेक वेळा अपघात होऊन देखील इथं उपचार मिळत नाहीत त्यामुळे रुग्ण दगावले आहेत त्यामुळे भरमसाठ पगार देऊन या अधिकार्यांना पोसण्याचे काम सुरू आहे. या वैद्यकीय अधिकार्यांना ताळ्यावर आणण्याची गरज आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी श्री कोडलकर यांच्याशी पहाटे संपर्क साधला असता ते म्हणाले आमच्याकडे एकच शिपाई असून दिवसभर तो काम करत असतो म्हणून तो रात्री थांबत नाही अन बाकीचे अधिकारी कर्मचारी तिथेच निवासस्थानी राहत आहेत तरी सदर बाब गंभीर स्वरूपाची आहे, मी माहिती घेतो, असे त्यांनी सांगितले.
जयाभाऊ हे बरं नव्हं
काही दिवसांपूर्वी दहिवडी आरोग्य केंद्राच्या बाहेर रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसुती झाली होती. तर मार्डी केंद्रातही असाच प्रकार घडला होता. आता आरोग्य केंद्राबाहेरही असाच प्रकार घडल्याने माण तालुक्याचे दबंग आमदार जयकुमार गोरे यांनी अशा डॉक्टरांना पाठबळ न देता त्यांच्यावर कडक कारवाईसाठी सरकारकडे पाठपुरावा करावा, अन्यथा जयाभाऊ तुमच्या तालुक्यात सुरु असलेले प्रकार बरं नव्हंत, असंही सामान्य लोक बोलू लागले असून आता आमदार काय भूमिका घेणार हे पाहणेही औत्सुक्याचे आहे.

0 Comments