सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
शेंद्रे : दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी व कोणतेही पुरावे द्यायचे नाहीत यासाठी बंदुकीचा धाक दाखवून सातार्यातील सामाजिक कार्यकर्ता असलेल्या महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सहाजणांविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी हर्षदा दिनकर शेडगे (वय 30, रा. 69, करंजेपेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली.
यशपाल अनिल कदम (रा. देऊर, ता. कोरेगाव), योगिता विनोद भागवत, विनोद भागवत (पूर्ण नाव माहित नाही, दोघे रा. अनपटवाडी, ता. कोरेगाव, सध्या रा. पनवेल) व अन्य दोन अनोळखी इसम, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सदरची घटना 2 जुलै रोजी सातारा ते कराड दरम्यान महामार्गावर खोडद गावच्या हद्दीत खोडद-निसराळे गावी जाणार्या रस्त्यावर घडली.
संशयितांनी संगनमत करून दिलेल्या चिथावणीवरून दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या ताब्यातील होंडा कंपनीची दुचाकी शेडगे यांच्या चारचाकीला रस्त्यात आडवी मारली. त्यानंतर पाठीमागे बसलेल्या एकाने त्याच्या हातातील कपड्याने झाकलेल्या बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत आम्हाला विनोद भागवतने पाठवले आहे. आम्ही पनवेलचे डॉन आहोत. यशपाल कदम व नातेवाई यांच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घे, योगिता कदम हिने दाखल केलेल्या गुन्ह्यात तू कोणतेही पुरावे द्यायचे नाहीत. दिलेल्या तक्रारी परत घ्यायच्या व गप्प बसायचे नाहीतर तुला व तुझ्या घराला संपवू, अशी धमकी दिली. दरम्यान, पाठीमागे बसलेल्या इसमाच्या देहबोली व आवाजावरून तो अजित चंद्रसेन कदम असल्यासारखा वाटत असल्याचे शेडगे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करत आहेत.

0 Comments