सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क
गोंदवले :
माण तालुक्यातील वावरहिरे या ठिकाणी एका वृद्ध महिलेचे दागिने आज चार जणांनी भरदिवसा लांबवले. या चोरीत सुमारे पावणे दोन तोळ्यांचे दागिने घेऊन हे चोर फरार झाले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वावरहिरे येथे दहिवडी नातेपुते रोडवर असलेल्या भुजबळ वस्तीवरील विजय रामचंद्र भुजबळ यांच्या राहत्या घरी आज चोरांनी डल्ला मारला. विजय भुजबळ यांच्या आई अनुसया रामचंद्र भुजबळ या घरात जेवत असताना अचानकपणे आलेल्या चार जणांनी चाकूचा धाक दाखवत त्यांचे दागिने काढून घेतले.
त्यांनी आरडाओरडा करेपर्यंत ते चौघेजण वावरहिरेच्या बाजूला असलेल्या मुख्य पुलाकडे पळाले. मात्र त्या पुलाजवळ कोणतीही गाडी किंवा वाहन आढळले नाही. यावरून हे चोर ओढ्यामार्गे आल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला. हा एकंदरीत प्रकार कळल्यानंतर शिंगणापूर पोलिसांना फोनवरून कळवले, त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
0 Comments