सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क/पिंपोडे बुद्रुक
वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्यांच्या विद्युत डीपी चोरी करून त्यातील तांब्याच्या तारा लंपास करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या चौकशीत नांदवळ, अरबवाडी, अनपटवाडी, देऊर आणि पिंपोडे खुर्द परिसरातील तब्बल सात डीपी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी दोन लाख चार हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमोल ऊर्फ मुक्या विनोद भोसले वय २२ वर्षे रा. बनवडी ता.कोरेगाव जि.सातारा व शाहिदकपुर ऊर्फ गुटरी पप्पुसिंग पारधी वय २८ वर्षे रा.मालगाव ता.जि.सातारा अशी आरोपींची नावे आहेत.
त्यानुसार वाठार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून तसेच गोपनीय माहितीच्या आधारे डीपी चोरी करणाऱ्या संशयितांचा माग काढला.
संशयित बनवडी, ता. कोरेगाव येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके आणि त्यांच्या पथकाच्या मदतीने संशयितांकडे कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांनी वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सात विद्युत डीपी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत सात गुन्हे उघडकीस आले आहेत. नांदवळ, अरबवाडी, अनपटवाडी, देऊर आणि पिंपोडे खुर्द या परिसरातील शेतकऱ्यांच्या डीपी चोरीला गेल्या होत्या. चोरी केलेल्या डीपीमधील तांब्याच्या तारांचा २ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या कारवाईमुळे डीपी चोरीच्या घटनांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्युत डीपी चोरीमुळे पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे चोरीच्या घटनांचा छडा लावल्याबद्दल शेतकऱ्यांनी पोलिसांच्या कारवाईचे समाधान व्यक्त केले.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले, पोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले, पोलीस हवालदार सर्जेराव सुळ, जितेंद्र शिंदे, सहदेव तुपे, अजय झुंजार, आनंदराव भोसले, धिरज यादव, प्रकाश चव्हाण, विवेक शिंदे, पोलीस अंमलदार विठ्ठल काळे, प्रशांत गोरे, अधिक शेलार, प्रथमेश अलगुडे, एकनाथ सरगर, प्रतिक देशमुख आणि चालक पोलीस हवालदार राहुल पवार यांनी कारवाईत सहभाग घेतला. पोलीस हवालदार सर्जेराव सुळ पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांबाबत संशयित व्यक्ती किंवा महत्त्वाची माहिती आढळल्यास नागरिकांनी ती पोलिसांना गोपनीयपणे कळवावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी आणि सहायक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांनी केले आहे.

0 Comments