सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
वडूज: येथील एका महिला राजकीय नेत्याच्या घरी झालेल्या मोठ्या चोरीचा तपास लागलेला नसतानाच पुन्हा एकदा चोरट्यांनी भरदिवसा साडेतीन लाखांवर डल्ला मारत वडूज पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. पोलिसांचा धाक उरला नसून वडूजकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अधीक्षक समीर शेख लक्ष घालणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
येथील काळे मळ्यात दि. 11 रोजी सकाळी साडेअकरा ते साडेपाचच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानी हरिषचंद्र बजरंग काळे (वय 59) हे बाहेर गेलेले असताना त्यांच्या घराचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटात ठेवलेल्या लॉकरमधील व हॉलमध्ये ठेवलेल्या सोफा सेट, ड्रॉव्हरमधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 3 लाख 51 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
घटनास्थळी दहिवडी उपविभागाच्या अधीक्षक अश्विनी शेंडगे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या. तपास उपनिरीक्षक अमोल कदम करत आहेत.
इंगळेंना नकोय वडूजचे पोस्टींग?
येथील पूर्वीचे सहायक पोलीस निरीक्षक मालोजी देशमुख यांची बदली झाल्यापासून वडूज पोलिसांची कामगिरी सुमारच राहिली आहे. येथे हजर झालेले पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांना वडूजचे पोस्टिंग नको असल्याने ते येथे फारसे लक्ष घालत नसल्याची चर्चा त्यांच्याच खात्यात दबक्या आवाजात सुरु आहे. दरम्यान, इंगळे यांना दिलेले पोस्टींग हे अधिकृत नसून केवळ तोंडी सांगून एसपींनी त्यांना तेथे पाठवले असल्याचेही बोलले जात असून त्यामुळे इंगळे हे आला दिवस ढकलत असल्याचे मानले जात आहे. आता अधीक्षक समीर शेख यांनी यामध्ये लक्ष घालून योग्य तो न्याय करावा व वडूजकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
सहायक निरिक्षकाच्या प्रमोशनसाठी दबाव?
दरम्यान, एका लोकप्रतिनिधींच्या जवळच्या सहायक निरीक्षकाचे पोलीस निरीक्षक असे प्रमोशन होणार असून त्याला वडूजचे पोस्टींग देण्यात येणार आहे. त्यासाठीच काही दिवस अधीक्षकांकडून तोंडी सूचना देऊन सध्याच्या कारभार्यांना वडूजला बसवण्यात आले आहे. अधिक्षकांवर राजकीय दबाव असल्याची चर्चा पोलीस खात्यात सुरु आहे.
No comments:
Post a Comment