‘ज्ञानदीप’च्या वडूज शाखेत दीड कोटींचा अपहार - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, December 16, 2023

‘ज्ञानदीप’च्या वडूज शाखेत दीड कोटींचा अपहार

दोन शाखाप्रमुख, लिपिकांसह दहाजणांवर गुन्हा



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

वडूज ः  बनावट दस्तऐवज तयार करून येथील ज्ञादीप को आपॅरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखेत तब्बल दीड कोटींहून अधिक रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोन शाखाप्रमुखांसह तीन लिपिक आणि दहाजणांविरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे वडूज पसिररात खळबळ उडाली आहे.

लेखापरीक्षक हेमंत आनंदराव निंबाळकर (वय 47, रा. 1103, सुप्रिम विलो, हायलॅन्ड कॉम्प्लेक्स, चारकोप कांदिवली, पश्‍चिम मुंबई, मूळ रा. आदर्की खुर्द, ता. फलटण) यांनी फिर्याद दिली. दि. 2 जून 2019 ते 8 एप्रिल 2023 या कालावधीत हा अपहार घडल्याचे फिर्यादीत म्हटले असून शाखाप्रमुख दत्तात्रय बाबुराव राऊत (रा. शंभूराज हाईट्स, संजीवराजे रोड, फलटण), दुसरा शाखाप्रमुख भगवान शंकर बोराटे (रा. बिदाल रोड, दहिवडी), वरिष्ठ लिपिक किसन मोहन बोराटे (रा. बिदाल, ता. माण), वरिष्ठ लिपिक विठ्ठल रामचंद्र पवार (रा. पेडगाव रोड, वडूज), लिपिक समाधान शिवाजी सावंत (रा. विसापूर, ता. खटाव), लिपिक नितीन गुलाब वायदंडे, अजय प्रकाश जाधव, नीलेश गोरख जाधव, प्रियंका नंदकुमार माने, प्रतीक नंदकुमार माने (चौघे रा. वडूज, ता. खटाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

संशयितांनी ज्ञानदीच्या वडूज शाखेत संगनमत करून इतर दहा खातेदारांच्या खात्याचा वापर करून तसेच संगणकावर बनावट नोंदी करून घेत खोटे रेकॉर्ड बनवून बँकेची रक्कम जुळवाजुळवी केली. त्यातील रक्कम 1 कोटी 7 लाख 90 हजार 500 रुपये, आरटीजीएस मार्फत 51 लाख 30 हजार रुपये, संथेची अनामत रक्कम 12 हजार 700, अजय गोरख जाधव याच्या खात्यावर शिल्लक असलेली रक्कम 2 लाख 22 हजार रुपये असा एकूण 1 कोटी 61 लाख 55 हजार 200 रुपयांचा अपहार केला.

ही बाब शासकीय लेखापरीक्षणात सिद्ध झाल्याने निंबाळकर यांनी वडूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून तपास सहायक पोलीस निरीक्षक माने करत आहेत.

No comments:

Post a Comment