बक्षीसपत्रात घोळ, एकाच जागेचे दोन वेळा बक्षीसपत्र झाल्याने माण तालुक्यात खळबळ - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, December 7, 2023

बक्षीसपत्रात घोळ, एकाच जागेचे दोन वेळा बक्षीसपत्र झाल्याने माण तालुक्यात खळबळ

 
सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क
गोंदवले : दहिवडी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामावर प्रश्नचिन्ह एकाच गटात असणाऱ्या एकाच व्यक्तीच्या एका जागेचे दोनदा बक्षीसपत्र झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 
 सविस्तर हकीकत अशी की मार्डी येथील गट नंबर १९१,१९२ आणि १९३ असून डॉ.प्रमोद नारायणे यांनी त्यांचे वडील नारायण नारायणे यांच्या सहमतीने वरीलपैकी १९३ या गटाचे खरेदीपत्र करून घेतले होते. त्याची अधिकृत नोंदही करण्यात आली होती. मात्र प्रमोद नारायणे यांचे बंधू कृषी सहायक रवींद्र नारायणे यांनी त्यांच्या वडिलांना विश्वासात घेत त्याच जागेचे बक्षीसपत्र पुन्हा एकदा केले. यामध्ये अधिकारी,मुद्रांक विक्रेते आणि जागामालक यांचे नेमके कोणते गौडबंगाल आहे? अधिकाऱ्यांना एकाच जागेची दोन बक्षीस पत्रे करण्यासाठी किती पैसे मिळाले? एकाच व्यक्तीच्या नावे असलेल्या एकाच जागेचे खरेदीपत्र आधी झाले असतानाही सध्याच्या जागा मालकाचे खरेदीपत्र पुन्हा एकदा झालेचं कसे? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
त्यामध्ये दुय्यम निबंधक श्रेणी -१, मुद्रांक विक्रेते आणि भूमी अभिलेखचे अधीक्षक हे सामील असल्याची चर्चा माणमध्ये रंगली आहे.
एकंदरीत प्रकार एवढा गंभीर असून मुद्रांक विक्रेत्यांनी दिलेल्या पत्रामध्ये हा सर्व प्रकार नजरचुकीने झाला असल्याची स्पष्ट नोंद केली आहे. त्यामुळे मुद्रांक विक्रेते दुय्यम निबंधक आणि भूमि अभिलेख अधीक्षक यांनी संगणमताने एकाच जागेचे दुहेरी बक्षीसपत्र करण्याचा कार्यक्रम करत सर्वांनाच कोड्यात टाकले असून त्यांच्यावर कारवाईची मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे. या धक्कादायक आणि मोठ्या प्रकाराबाबत वरिष्ठ अधिकारी काय दखल घेणार आणि कोणती कारवाई करणार?याकडेही माणवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

भूमी अभिलेखने अशी सिटी सर्व्हे हद्दीतील नोंद चुकीच्या पद्धतीने नोंदवलीच कशी? असा सवाल डॉ.प्रमोद नारायणे यांनी विचारला आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांच्या नोंदी जवळपास वर्षभर खोळंबलेल्या असतात,मात्र ही चुकीची नोंद भूमी अभिलेख कार्यालयाकडून एवढ्या त्वरित कशी काय झाली? हे न उलगडणारं कोडं असून याबाबत मुद्रांक विक्रेता, भूमी अभिलेख कार्यालय आणि दुय्यम निबंधक कार्यालय यांचं आणि नोंद करण्यास सांगणाऱ्या लोकांच्या आर्थिक तडजोडीशी संलग्न आहे का? अशी विचारणाही डॉ.नारायणे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment