सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: ब्राह्मण समाज सहजासहजी एकत्र येत नाही, या तथ्याला सातारा शहर परिसरातील हजारो ब्रह्मवृंदांनी छेद दिला. निमित्त होते ब्राह्मण महासंघाच्यावतीने शनिवारी आयोजित परशुराम जन्मोत्सव कार्यक्रमाचे. पावसाचे सावट असतानाही खचाखच भरलेल्या शाहू कला मंदिरातील कार्यक्रमात समस्त ब्रह्मवृंदांनी एकीचा हुंकार भरला.
या कार्यक्रमास अॅनलायझर न्यूज चॅनेलचे संपादक सुशील कुलकर्णी, परम विशिष्ट सेवा मेडल विजेते लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी, वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले, गोविंदशास्त्री जोशी आदी मान्यवर उपस्थित होते
हिंदू वाचवण्यासाठी ब्राह्मण समाजाला एकत्र यावे लागेल
हिंदू घर्म टिकवण्यासाठी त्या धर्माचा खरा अर्थ ब्राह्मण समाजाने वस्तुस्थितीपूर्ण सांगणे गरजेचे आहे. ब्राह्मण समाजाला विनाकारण मनुवादी म्हणून हिणवले जाते. मनुस्मृती हा धर्मग्रंथ नाही तर नियमांचा ग्रंथ आहे. मनुस्मृती ही रचना क्षत्रिय रचना होती त्याकरता ब्राह्मण वर्ग दोषी कसा? ब्राह्मण समाजाने स्वतःची ओळख धर्मशास्त्र समजून घेत पटवली पाहिजे. धर्म वाचवण्यासाठी ब्राह्मण समाजाला मजबूत संघटना उभारावी लागेल, आपली ताकद दाखवावी लागेल, असे प्रतिपादन सुशील कुलकर्णी यांनी यावेळी केले.
ब्राह्मण समाजाने आपली ओळख का लपवायची? ब्राह्मण ही व्यवस्था आहे, जात नाही जी हिंदू धर्माला एका सूत्रात बांधते. ब्राह्मण समाजावर विनाकारण विचित्र आक्षेप केले जातात. त्याचे उत्तर मंथनातून आणि बुद्धीनेच द्यायला पाहिजे. ब्राह्मण समाजाला विनाकारण मनुवादी म्हणून हिणवले जाते. मनुस्मृती हा नियमांचा ग्रंथ आहे, धर्मग्रंथ नाही. मनुस्मृतीची रचना ईश्वाकू वंशातील मनू राजाची होती. त्यासाठी ब्राह्मण समाजाला दोषी कसे घरावे?
मनूची व्यवस्था कर्माधिष्ठित होती. अट इतकीच होती की कर्मकांडात विचारांची कर्मठता येऊ नये. हिंदू धर्मशास्त्र म्हणजे दुसरे विज्ञान आहे. ब्राह्मण समाजाने स्वतःची ओळख पटवली पाहिजे. हिंदू धर्म वाचवण्यासाठी सर्व ब्राह्मण समाजाला एकत्र येणे गरजेचे आहे. शूद्र व्यवस्थेला कमी लेखले जाणे हा एक दुसरा आक्षेप आहे. मात्र मनुस्मृतीच्या रचनेप्रमाणे शूद्रांची उत्पत्ती ही मनुष्याच्या पायातून झालेली आहे. मंदिरामध्ये आपण परमेश्वराच्या चरणीच डोके ठेवतो म्हणजे आपण शूद्र व्यवस्थेचा आदरच करतो. मनुस्मृती ग्रंथ योग्य पद्धतीने आणि त्याचा शास्त्रीय अर्थ लावला गेला पाहिजे
केवळ परशुराम जन्माचा घोष करून चालणार नाही तर हिंदू धर्मशास्त्राचा अर्थ बारकाईने समजून घ्यावा लागेल. ब्राह्मण समाजाने एकत्र येत त्यांना संघटनेची शक्ती वापरून आपली ताकद दाखवावी लागेल. एक मुखाने नाही तर आपल्यावर होणारा अन्याय अनेक मुखाने बोलायला पाहिजे. राजकीय वळचणीला जाऊन संघटन मजबूत करू नका. अशी संघटने कलुषित हेतूने नेस्तनाबूत होतात. ब्राह्मण समाजाच्या मुलांमध्ये नैराश्य आहे. त्यांची लग्न ठरत नाहीत. आपल्या मुलांना व्यवसायाभिमुख बनवा, त्यांना हिंदू धर्माचा खरा अर्थ सांगा. आयुष्य जगण्याची खरीच जाणीव जर ब्राह्मण मुलांना करून दिली तरच त्यांची पुढील वाटचाल सुकर होणार आहे
आम्ही आपला धर्म स्पष्ट केला नाही म्हणून हे आक्षेप आपल्यावर नोंदवले जातात. हिंदू धर्म टिकवण्यासाठी ब्राह्मण समाजाला मजबूतरित्या संघटनात्मक काम करून एकत्र यावे लागेल, असे त्यांनी सांगितले.
सर्जिकल स्ट्राईकची अनुभूती
लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी लष्कर सेवेतील तसेच सर्जिकल स्ट्राईच्या अनेक थरारक आठवणी सांगून उपस्थितांना त्याची अनुभूती मिळवून दिली. शिवाय एकमुखाने एकसंधपणे पुढे येणारा समाजच प्रगती करतो हे मुद्देसूदपणे पटवून दिले. ब्राह्मण समाज हा मुखातून प्रकट होतो म्हणून तो व्यवस्थेचा प्रभावी माध्यम ठरतो. ही माध्यमे आपण टिकवली पाहिजेत असे त्यांनी सांगितले.
गोविंदशास्त्री जोशी, अनिरुद्ध गुमास्ते यांनी परशुराम स्तोत्र, शांतीपाठ पठण, रेणुका अष्टक म्हटले. "नारायणी" ग्रुप सातारा शिवतांडव स्तोत्र पठन व भरतनाट्यम सादरीकरण डाॅ.विशाखा सोहनी,मृणमयी मेहंदळे,पृथा टोणपे यांनी केले. यावेळी चैत्र गौरी हळदी-कुंकवाचे आयोजिनही करण्यात आले होते. परशुराम जन्मोत्सवाची मांडणी ब्राह्मण महासंघ, साताराचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी केली. समाजातील यशस्वीतांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महासंघाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
ब्राह्मण महासंघाने शिवधनुष्य पेलले
ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी व त्यांच्या सहकार्यांनी केवळ तीन ते चार बैठका घेऊन ब्रह्मवृंदांच्या एकीसाठी कंबर कसली होती. त्यानुसार प्रत्येकाने घरचे कार्य समजून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. पावसाचे सावट असताना कार्यक्रमाची शंका दूर करत शहर व परिसरातील ब्रह्मवृंदांनी कोणताही अडथळला असला तरी एकी कायम राहील, याचे दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून घडवले. त्यामुळे ब्राह्मण एकीचे शिवधनुष्य ब्राह्मण महासंघाने पेलून त्याचा टणत्कार सर्व समाजापर्यंत पोचवल्याच्या प्रतिक्रिया कार्यक्रमातून उमटल्या.
0 Comments