सज्जनगड घाटाच्या दरीमध्ये युवती कोसळली, ठोसेघर व्यवस्थापन समिती व सातारा तालुका पोलिसांचे बचाव कार्य - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, August 4, 2024

सज्जनगड घाटाच्या दरीमध्ये युवती कोसळली, ठोसेघर व्यवस्थापन समिती व सातारा तालुका पोलिसांचे बचाव कार्य

सातारा : सज्जनगड ठोसेघर मार्गावरील बोरणे गावच्या हद्दीतील मंकी पॉईंट परिसरात एक युवती  दरीत कोसळली . सेल्फी काढण्याच्या नादात हा प्रकार घडल्याची चर्चा असून सातारा शहरानजीकच्या डोंगर भाग परिसरातील हा दुसरा अपघात आहे . ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समिती व सातारा तालुका पोलिसांनी बचाव कार्य वेगाने राबवून त्या युवतीचे प्राण वाचवले आहेत मात्र संबंधित युवतीचे नाव समजू शकलेले नाही तिला अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
याबाबतची अधिक माहिती अशी स्कॉर्पिओ वाहनांमधून पाच पुरुष व दोन युवती ठोसेघरच्या दिशेने जात होते .सज्जनगड घाटामध्ये बोरणे गावच्या हद्दीतील मंकी पॉईंटवर त्यातील एक युवती पावसामध्ये खाली उतरली .सेल्फी काढण्याच्या नादामध्ये ही युवती सुमारे 100 फूट खाली कोसळली अशी परिसरात चर्चा होती . त्यावेळी गाडीतील सर्वांनी एकच गोंधळ केला ही घटना सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यान घडल्याची माहिती आहे .
या घटनेची माहिती कळताच ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे कर्मचारी प्रवीण चव्हाण, प्रथमेश जानकर, समाधान काकडे, प्रतीक काकडे, रामचंद्र चव्हाण, तसेच सातारा तालुका पोलीस स्टेशनचे अविनाश मांडावे व सागर मदने तातडीने घटनास्थळी दाखल झाले . खोल दरीमध्ये दोरखंड टाकून या कर्मचाऱ्यांनी त्या युवतीला सुखरूपपणे वर आणले .अवघ्या अर्ध्या ते पाऊण तासांमध्ये हे बचाव कार्य करण्यात आले .मात्र दरीत कोसळल्याचा त्या युवतीला प्रचंड धक्का बसला होता तसेच त्यामध्ये ती जखमी झाली होती. संबंधित युवतीला अधिक उपचारासाठी साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घाटातील प्रवासामध्ये पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाऊन आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी केले आहे

No comments:

Post a Comment