औंधमध्ये भरदिवसा चोरी, पोलिसांना नाही गांभीर्य - सत्य सह्याद्री

Saturday, August 10, 2024

औंधमध्ये भरदिवसा चोरी, पोलिसांना नाही गांभीर्य

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
औंध:औंध आणि परिसरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सतत चोरीच्या घटना समोर येत आहेत. कोठे दुकाने फोडल्याच्या घटना घडल्या आहेत तर कोठे जनावरे (गाय, म्हैस) चोरण्यासाठी चोरट्यांनी प्रयत्न केल्याचे शेतकरी सांगत आहेत. औंध पोलीस स्टेशनने मात्र या सगळ्या घटनांना गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाहीये. रात्रीची गस्त वाढवली म्हणजे चोऱ्या कमी होतील हा फौजदारांचा अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरलेला असल्याचे दिसत आहे. 
         औंधमध्ये शनिवार दि. 10 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजणेच्या सुमारास औंध पुसेगाव रस्त्यावर असलेल्या यमाई नगर मधील रहिवासी असलेले आणि औंध ग्रामपंचायतीमध्ये क्लार्क पद भूषविलेले श्रीनिवास फडणीस यांच्या घरासमोरून त्यांच्या मालकीची काळ्या रंगाची होंडा कंपनीची युनिकॉर्न (MH 14 BY 9432) ही दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. भरदिवसा चोरी झालेने औंधमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस स्टेशनचा धाक आता चोरांना राहिलाय की नाही असे लोक कुजबुजत आहेत. एकीकडे औंध परिसरातील चोरीच्या घटना वाढत असताना अवैध धंदे देखील फोफावत आहेत. या सर्व गुन्हेगारी घटनांवर चाप बसविण्यामध्ये औंधमधील पोलीस अधिकारी कमी पडत आहेत का...? असा सवाल सामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे.
         औंध पोलीस स्टेशन आणि ग्रामपंचायत यांनी एकत्रितपणे ग्राम सुरक्षा यंत्रणा कमिटी मार्फत जनजागृती करणे गरजेचे आहे. संशयित व्यक्ती दिसल्यास जनतेने पोलिसांना माहिती कळविणे अथवा ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावर (18002703600) संपर्क साधणे यासंबंधीची माहिती पोलीस खात्याने ग्रामस्थांना देणे गरजेचे आहे, मात्र पोलिसांकडून ग्रामस्थ अथवा पत्रकार यांच्याशी समन्वयाचा अभाव दिसत आहे. औंध पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी औंधमधील काही प्रमुख नागरिक, आजी/माजी ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार आणि युवा सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी समन्वय साधून ग्राम सुरक्षा यंत्रणा चांगल्या पद्धतीने कशी राबविता येईल यासंदर्भात चर्चा करून नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे आहे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment