पाटण : सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कराड–चिपळूण मार्गावर येरफळे गावच्या हद्दीत दुचाकी अन पिकअप वाहनाच्या धडकेत नवदाम्पत्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी दुपारी घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीस सूत्रांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सडादाढोली येथील राजू विठ्ठल झोरे (वय २५) अन पत्नी राणी राजू झोरे (वय २३) हे दुचाकीवरून शिराळा येथे जात होते. येरफळे येथील गारवा हॉटेलसमोर ट्रकला ओलांडताना समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाची दुचाकीला जोरदार धडक बसली.
या भीषण अपघातात राजू झोरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या राणी झोरे यांना उपचारासाठी कराड येथे नेत असताना त्यांचाही मृत्यू झाला. विशेष म्हणजे या दोघांचे लग्न केवळ दहा दिवसांपूर्वी झाले होते.
या प्रकरणी पिकअप चालकाविरुद्ध पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश कवठेकर करत आहेत.
0 Comments