कोरेगाव
अल्टो कार चालविण्यावरुन तडवळे संमत कोरेगाव येथे शनिवारी सकाळी झालेल्या मारामारीत दोघे जण जखमी झाले आहेत, त्यापैकी एकाची प्रकृत्ती गंभीर असून, त्याच्यावर सातार्यातील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, की अजिंक्य शरद बेबले ही बी. एस. एफ. मध्ये नोकरीस असून, ते गेले काही दिवस सुट्टीवर गावी तडवळे संमत कोरेगाव येथे आले आहेत. काही कामानिमित्त शुक्रवारी सायंकाळी ते कुटुंबियांसमवेत अल्टो कार घेऊन सातार्याला चालले होते. गावापुढे रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात त्यांनी कार वेडीवाकडी चालवली, त्याचवेळी समोरुन मोटारसायकलवर आलेल्या आकाश प्रल्हाद झांजुर्णे याने त्याला शिवीगाळ केली. आकाश हा गावात निघून गेला तर अजिंक्य हा सातार्याला गेला.
शनिवारी सकाळी 7.30 च्या सुमारास अजिंक्य हा कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर घरात नाष्टा करत असताना तेथे आकाश झांजुर्णे व प्रल्हाद निवृत्ती झांजुर्णे हे तेथे गेले. त्यांनी सरळ अजिंक्यला घराबाहेर उचलून आणले. शिवीगाळ, दमदाटी करत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. अजिंक्य याच्या डोक्यात कोयत्याने वार केला तर लाकडी दांडक्याने डाव्या पायाला मारहाण करण्यात आली. भांडणे सोडविण्यास गेलेल्या शरद झांजुर्णे यांना देखील मारहाण करण्यात आली. कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांनी तातडीने मोटारसायकलवरुन अजिंक्य याला कोरेगावातील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले, मात्र प्रकृत्ती चिंताजनक असल्याने त्याला सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी शरद झांजुर्णे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्रकाश प्रल्हाद झांजुर्णे, प्रल्हाद निवृत्ती झांजुर्णे, आकाश प्रल्हाद झांजुर्णे, धिरज तानाजी माने, गणेश नागेश झांजुर्णे व किरण श्रीमंत झांजुर्णे यांच्या विरोधात मारहाण व खुनाचा प्रयत्न असा गुन्हा दाखल केला आहे. त्यांना रितसर अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक बळीराम सांगळे तपास करत आहेत.

0 Comments