सातारा, 24 सप्टेंबर-
गत तीन वर्षात भारताने केेलेल्या सर्वच क्षेत्रातील प्रगतीने जगभरातील बडे देश आता भारताबरोबर मैत्री करण्यास उत्सुक आहेत असे प्रतिपादन भारत-तिब्बत सहयोग मंचचे संरक्षक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य इन्द्रेश कुमार यांनी केले.
येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित भारत-तिब्बत सहयोग मंचतर्फे आयोजित पश्चिम महाराष्ट्र कार्यकर्ता संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्राचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, भारत-तिब्बत सहयोग मंचचे महाराष्ट्र, गोवा पश्चिम क्षेत्र संंयोजक उमेशकुमार देशमुख, दिलीप पेठे, भारत-तिब्बत सहयोग मंचचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री भरत पाटील, केदार डोइफोडे, भारत-तिब्बत सहयोग मंच जिल्हा अध्यक्ष अमोल सणस, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
इन्द्रेश कुमार पुढे म्हणाले, चीनने तिबेटवर अनधिकृतपणे ताबा मिळवत आपले वर्चस्व स्थापन केले आहे. त्यामुळे बौद्ध धर्मगुरु दलाईलामा यांना भारतात आश्रय घ्यावा लागला आहे. तिबेटची भूमी बळकावून चीनने भारतावर शिरजोरी सुरु केली आहे. या शिरजोरीच्या विरोधात 5 मे 199 रोजी भारत-तिब्बत सहयोग मंचची स्थापना करण्यात आली आहे. तिबेटच्या मुक्तीसाठी भारतात मोठे जनजागरण होणे आवश्यक आहे असे सांगत इन्द्रेशकुमार यांनी यासाठी भारतातील प्रत्येकाने सहयोग द्यावा असे आवाहनही यावेळी केले.
चीन हा कधीच मित्र होवू शकत नाही असे सांगत ते पुढे म्हणाले, चीनबाबत नेपोलियन म्हणाला होता की, चीन हा झोपलेला अजगर आहे. तो ज्यावेळी जागा होईल त्यावेळी विनाशकारी असेल, बिपिनचंद्र पाल म्हणाले होेते की, चीन हा अजगरासमान आहे. अत्याचारीज चीनपासून सावध राहायला हवे.चीनच्या क्रूरतेचे एक उदाहरण देताना ते म्हणाले, ज्यावेळी चीनमध्ये एक मोठे आंदोलन झाले होते त्यावेळी चीनमधील सर्वात मोठ्या चौकात जमलेल्या लाखो नागरिकांना राज्यकर्त्यांनी चारीबाजूंनी कोंडी करत अक्षरश: रणगाड्यांनी चिरडून टाकले होते. चीनने आतापर्यंत सिक्कीम, भूतान, नेफा, मान्यमार या देशाच्या सीमांवर अतिक्रमण करत आपले वर्चस्व तयार केले आहे.
भारताने तत्कलिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना बेसावध ठेवत 1962 सालचे युद्ध लादले. आणि आपला कित्येक किलोमीटरचा भूभाग हडप केला. या युद्धामुळे मानससरोवरासारखे हिंदुंचे पवित्र स्थानही त्यांच्या ताब्यात गेले.
तिबेटींचा संपूर्ण वंशच नष्ट करण्याचे षढयंत्र चीनने रचले असून याअतंर्गत चीनी युवकांचे विवाह तिबेटी युवतींशी करुन त्यांचा वंश संपवून टाकण्याचा त्यापाठीमागे उद्देश असल्याचे इन्द्रेशकुमार यांनी सांगितले.
दरम्यान, आता 50-60 वर्षांपूर्वीचा भारत राहिला नसून तो आता महासत्तेच्या दिशेने निघाला आहे. डोकलामच्या धड्याने हे चीनला कळाले आहेच. डोकलाममध्ये भारताला आपण धडा शिकवू अशा अविर्भावात चीन होते मात्र आपल्या राज्यकर्त्यांनी केलेली अचूक खेळी व सैन्यदलाचा आत्मविश्वास यामुळे त्यांना जगात मानहानीकारकपणे माघार घ्यावी लागली. त्याआधी मात्र त्यांनी पाकिस्तानशी हातमिळवणी करत भारताला शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र आमचे सैनिक एकाचवेळी दोन्ही देशांशी लढा देण्यास कुठेच कमी पडणार नाहीत असा विश्वास व्यक्त करत फिजिकली मेंटल असलेल्याला बरे करता येते मात्र मेंटली मेंटल झालेल्याला कसे बरे करणार असा टोलाही लगावला.
चीनच्या बाबतीत आता भारतीय जनताही जागरुक होवू लागली असून त्यांच्या आर्थिक वर्चस्वाला धक्का देणारे निर्णय घेतले जात आहेत ही निश्चितच भूषणावह बाब आहे. त्यांच्याशी व्यापार करण्यास आता भारतातील एकही कंपनी उत्सुक नाही. यांचा मोठा परिणाम चीनच्या निर्यात मालावर झाला आहे. चिनी बनावटीच्या खेळण्याला वापरण्यात येणार्या रंगात विषारी रासायनिक घटकामुळे घातक रोग होण्याची शक्यता असल्याचे मत विविध देशांच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. यापाठीमागे नवीन पिढी बरबाद करण्याचे चीनचे षढयंत्र आहे.
आता मात्र सर्वच भारतीय जागे झाले आहेत आणि त्यांनी चीनचा माल विकत न घेण्याची शपथ घेतली असल्याचे सांगत उपस्थित सभागृहातील सर्वांना दोन्ही हात करुन ‘चिनी माल नही नही’ अशी शपथ घ्यायला लावली. चिनी मालाच्या बाबातीतील हे अभियान आपण सर्वांनी भारतातील खेडोपाड्यात पोहोचवावे असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
पाकिस्तान हा आतंकवादी पोसणारा देश आहे. मात्र, चीन त्यांना पाठीशी घालत असले तरी त्याचा काहीही लाभ होत नसल्याचे त्यांनी ब्रिक्स परिषदेचे उदाहरण देत पटवून दिले. चीनला आता सर्वत्र विरोधक तयार होत असून याउलट भारताशी मैत्री करण्यास जगभरातील अनेक देश उत्सुक आहेत असे नमूद करत त्यांनी भारत एका मोठ्या महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सांगितले.
भारताने जी अणुस्फोट चाचणी घेतली त्याचे सर्व श्रेय आपल्या कुशल आणि अतिउच्च सावधगिरीने काम करणार्या या क्षेत्रातील दिग्गजांचे आहे.अनेक देशांचे सॅटेलाईट पृथ्वीबाहेरुन आपल्यावर लक्ष ठेवून असताना त्यांना सर्वांना चकवत आपण अणुस्फोट चाचणी केली. त्यावर अनेकांनी हे कसे झाले? असे प्रश्न उपस्थित केले.
‘दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल’ हे बापूजींवर रचलेले गाणे त्यांच्या निर्वाणानंतरचे आहे. ते जिवंत असताना त्यांनी हे गाणे मुळात रचू दिले नसते. आणि वाजवूही दिले नसते. कारण त्यांना माहित होते की, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तब्बल 72 लाख जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. जर हे गाणे त्यांच्या हयातीत वाजले असते तर ते त्याविरोधात आमरण उपोषणाला बसले असते असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कूटनितीनचे कौतुक करत त्यांनी मास्को वरुन भारतात येताना त्यांनी ज्या मार्गाने येवून पाकिस्तानला अचानक भेट दिली तो किस्सा सांगत पाकिस्तानमध्ये आम्ही कसेही, कधीही येवू शकतो असा संदेश दिल्याचे नमूद केले.
व्याख्यानाच्या समारोपप्रसंगी त्यांनी सातार्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान योद्धा भारताला दिल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत या भूमितूनच जनजागृतीच्या कार्यक्रमाचा प्रारंभ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी मंत्री सुभाष देशमुख म्हणाले, राष्ट्रजागृतीचे जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या 60 वर्षानंतरही आपण जगाच्या खूप मागे आहोत. याची मूळ कारणे शोधली पाहिजेत. आपल्या भारतात तयार होणारीच उत्पादने आपण विकत घेतली पाहिजेत. चीनसारखा देश गॅरंटी नसताना स्वस्त वस्तूंची विक्री करत आपली बाजारपेठ निर्माण करण्याचा हातखंडा राबवतो. आपणही देशातील उद्योजकांची उत्पादने विकत घेतली पाहिजेत तरच आपला भारत देश खर्या अर्थाने संपन्न होईल. पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांना सर्वांची साथ असेल तर राष्ट्र वैभवशाली होईल असा विश्वास व्यक्त करत याकामी सक्षम व लढवय्या अशा सातार्याने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेेश महामंत्री भरत पाटील यांनी प्रास्ताविकात देशासाठी वेळ देण्याचे आवाहन करत देश सुरक्षित ठेवायचा असेल तर कार्यकर्ते जोडले पाहिजेत असे आवाहन केले.
कार्यक्रमास सातारा नगरपालिकेतील डॉक्टर दिलीप येळगावकर, दीपक पवार, दत्ताजी थोरात, भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे, सिद्धी पवार, मिलिंद काकडे, विजय काटवते, विकास गोसावी तिब्बत मंच चे शहराध्यक्ष धीरज घाडगे, यांच्यासह मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील मोरे यांनी सूत्रसंचालन केले अमोल सणस यांनी आभार मानले
0 Comments