राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य इन्द्रेशकुमारजी यांची विशेष उपस्थिती
जिल्हा बँकेच्या सभागृहात रंगणार संमेलन सोहळा
सातारा, 21 सप्टेंबर
राष्ट्रीय विचारांनी प्रेरीत भारत तिब्बत सहयोग मंचातर्फे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले कार्यकर्ता संमेलन येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात रविवार दि. 24 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत होणार असल्याची माहिती मंचचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री भारत पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्राचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची या संमेलन सोहळ्यास उपस्थिती असून भारत तिब्बत सहयोग मंचचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य इन्द्रेशकुमारजी यांचे प्रकट व्याख्यान होणार आहे. या सोहळ्यास उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भारत तिब्बत सहयोग मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष भगतसिंग कोश्यारी, मंचचे राष्ट्रीय महामंत्री पंकज गोयल, महाराष्ट्र- गोवा पश्चिम क्षेत्राचे संयोजक उमेशकुमार देशमुख, पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत अध्यक्ष डॉ. राजेश कोकरे, सातारा जिल्हाध्यक्ष अमोल सणस या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
भारत तिब्बत सहयोग मंच हा भारताच्या उत्तरेला असणार्या तिबेट राष्ट्राचे स्वातंत्र्य, कैलास मानस सरोवराची मुक्ती, भारताची सुरक्षितता या उद्दिष्टांना वाहिलेला आहे.
या संदर्भात माहिती देताना महामंत्री भारत पाटील म्हणाले, आशिया खंडामध्ये भारत आणि चीन यांच्यातील संबंध संवेदशील राहिलेले आहेत. चीनने तिबेटच्या भूमीचा वापर करून सातत्याने भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर दबावात कसा राहील? याची रणनिती गेल्या काही दशकापासून आखली आहे. त्यासाठी भारताने सामरिकदृष्ट्या चीनची कोंडी करण्यासाठी गेल्या काही वर्षात चिनी मालावर बंदी घालणे, यासारखे धोरणात्मक निर्णय घेण्यास सुरवात केली आहे. या धोरणांचा प्रसार आणि प्रचार करण्याच्यादृष्टीने भारत-तिब्बत सहयोग मंचातर्फे पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच सातार्यामध्ये रविवार दि. 24 रोजी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात कार्यकर्ता संमेलन आयोजित केले आहे.
इन्द्रेशकुमारजी यांचा अल्पपरिचय
इन्द्रेशकुमारजी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 1970 पासून प्रचारक आहेत.ते जम्मू काश्मिर या राज्यात सक्रीय होते. बी. ई. मॅकॅनिकल शिक्षण असलेल्या इन्द्रेशकुमार यांचा जन्म पंजाबमध्ये झाला. राष्ट्रीय मुस्लिम मंचचे ते प्रचारक आहेत. चीनची आर्थिक नाकेबंदी, चिनी वस्तूंचा वापर थांबविणे या उद्दिष्टांसाठी गेल्या चार दशकापासून ते सहयोग मंचाच्या माध्यमातून सक्रीय आहेत. सहयोग मंचाचे सातार्यात प्रथमच संमेलन होत असून संपूर्ण राज्यात 250 ते 300 स्वयंसेवक या संमेलनासाठी उपस्थितीत राहणार आहेत.
पत्रकार परिषदेस केदार डोईफोडे, अमोल सणस, शहराध्यक्ष धीरज घाडगे, सुवर्णा राजे, उल्का जगदाळे, नीलेश यादव, तुषार जगताप, उमेशकुमार देशमुख आदी उपस्थित होते.

0 Comments