सातारा
सभासद शेतकर्यांनी आपल्याला विकाससेवा सोसायटीचा कारभार पाहण्याची बिनविरोध संधी दिली आहे. याची जाणीव सर्व सदस्यांनी ठेवून गट- तट बाजूला सारून सोसायटीचा कारभार करावा. सत्तेच्या माध्यमातून चांगला कारभार करुन सोसायटीच्या माध्यमातून शेतकर्यांची उन्नती साधावी. नुतन चेअरमन लक्ष्मण पडवळ यांनी मिळालेल्या संधीचे सोने करुन शेतकर्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे, असे आवाहन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
एक वर्षापुर्वी शेंद्रे (ता. सातारा) येथील विकाससेवा सोसायटीची निवडणूक आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली होती. विद्यमान चेअरमन यांनी राजिनामा दिल्यानंतर चेअरमनपदी लक्ष्मण पडवळ तर, व्हा. चेअरमनपदी बजरंग काशीद यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमन पडवळ व काशीद यांचा आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनंता वाघमारे, अशोक शेडगे, बाजार समितीचे सभापती अॅड. विक्रम पवार, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव चव्हाण, भानुदास पडवळ, महादेव जाधव, नामदेव माने, सुभाष माने, अरविंद जाधव, विजय सुर्यवंशी, वसंत पडवळ, आप्पा निकम, मारुती पडवळ, नामदेव पडवळ, दिलीप पडवळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, गावचा विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत आणि सोसायटीचा सहभाग खूप महत्वाचा ठरतो. सोसायटीच्या माध्यमातून शेतकर्यांना खर्या अर्थाने आर्थिक आधार मिळत असतो. त्यामुळे नवनिर्वाचित संचालक मंडळाने सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या विविध योजना राबवून शेतकर्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

0 Comments