कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा कायापालट करण्यासाठी सुमारे ९७ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोठ्या निधीतून स्टेडियममध्ये अनेक सुविधा निर्माण होत आहेत. त्यातील बॅडमिंटनची पाच सलग कोर्टे ही निश्चितच चांगली सुविधा आहे. मात्र, सुविधा निर्माण करताना त्या सुविधेचा प्रत्यक्ष वापर किती होणार, याचाही गंभीरपणे विचार प्रशासनाने करायला हवा होता.
कराडमध्ये बॅडमिंटनचा इतिहासही तितकाच महत्त्वाचा आहे. पुण्यानंतर कराडमध्ये प्रथमच बॅडमिंटनची सलग तीन कोर्ट उभारण्यात आली होती आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले होते. त्या काळात तीन कोर्ट उपलब्ध असतानाही खेळाडूंच्या पूर्ण बॅचेस सातत्याने भरत नव्हत्या. मग आज पाच कोर्ट उभारल्यानंतर त्यावर नियमितपणे खेळणारे खेळाडू कुठून येणार, हा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे...
माझा प्रश्न बॅडमिंटनच्या कोर्टांना विरोध करण्याचा अजिबात नाही. उलट, चांगल्या दर्जाची क्रीडा सुविधा शहरात निर्माण व्हावी, याचे स्वागतच आहे. परंतु कोट्यवधी रुपये खर्च करून सुविधा उभारताना त्या सुविधेची गरज, मागणी, वापर आणि भविष्यातील नियोजन यांचा अभ्यास झाला आहे का? हा प्रश्न मात्र गंभीर आहे.
आज कराड शहरात बॅडमिंटनच्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या खेळाडूंची संख्या पाहिली तर काही मोजकीच नावे समोर येतात. महेश सटवे, निलेश फणसळकर, यांच्यासारख्या खेळाडूंचा उल्लेख करता येईल. त्यापूर्वीच्या काळात आमच्या पिढीत ओगलेवाडीचे राव बंधू, कुमार शहा अशा काही खेळाडूंनी आपली ओळख निर्माण केली होती. पण त्यानंतर बॅडमिंटनचा व्यापक विस्तार कराडमध्ये झालेला दिसत नाही...
याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे बॅडमिंटन हा तुलनेने महागडा खेळ आहे. कोर्ट फी, प्रशिक्षण, कोचिंग, रॅकेट, शूज आणि इतर साहित्य यामुळे सर्वसामान्य किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना हा खेळ सातत्याने खेळणे सहज शक्य होत नाही. त्यामुळे बॅडमिंटनची सुविधा निर्माण झाली म्हणजे आपोआप खेळाडूंची संख्या वाढेल, असे समीकरण लावता येणार नाही...
म्हणूनच पाच कोर्ट उभारण्याबरोबरच शाळा, महाविद्यालये, स्थानिक क्रीडा संस्था आणि प्रशिक्षक यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बॅडमिंटनची चळवळ उभी करण्याची गरज आहे. गरीब आणि होतकरू मुलांसाठी मोफत किंवा अत्यल्प शुल्कात प्रशिक्षणाची व्यवस्था केली, तर या कोर्टांचा खऱ्या अर्थाने उपयोग होऊ शकतो. अन्यथा ही सुविधा काही मोजक्या आर्थिकदृष्ट्या सक्षम खेळाडूंपुरती मर्यादित राहण्याची शक्यता आहे...
पण खरी चिंता बॅडमिंटनपेक्षाही मोठी आहे...
स्टेडियमच्या पुनर्बांधणीमध्ये ज्या पद्धतीने संरचना आत घेतली जात आहे, त्यामुळे मैदानाचे मूळ क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. पॅव्हलिनच्या पायऱ्यांच्या परिसरापासूनची रचना पूर्वीच्या तुलनेत सुमारे २५ फूट किंवा त्याहून अधिक आत आलेली असल्याचे दिसते...
याचा सर्वात मोठा परिणाम अॅथलेटिक्सवर झाला आहे.
पूर्वी या मैदानावर ४०० मीटरचा धावण्याचा ट्रॅक कसाबसा बसत होता. आता उपलब्ध जागा पाहता तो ट्रॅक पूर्वीच्या स्वरूपात बसणे अत्यंत अवघड झाले आहे. म्हणजेच एका बाजूला नवीन क्रीडा सुविधा निर्माण करत असताना दुसऱ्या बाजूला आधीपासून अस्तित्वात असलेल्या अॅथलेटिक्ससारख्या मूलभूत खेळासाठीची जागाच कमी होत आहे...
परवा दिलीप चिंचकर सर भेटले. अॅथलेटिक्सशी आयुष्यभर जोडलेल्या व्यक्तीने व्यक्त केलेली खंत मनाला लागली. त्यांचे म्हणणे अगदी स्पष्ट होते—“आमचे अॅथलेटिक्स आता पूर्ण संपले.” ही केवळ एका व्यक्तीची नाराजी म्हणून दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. या मैदानाशी अनेक वर्षे जोडलेल्या खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींच्या भावनांचा त्यामध्ये आवाज आहे...
क्रिकेटची परिस्थितीही वेगळी नाही. या मैदानाचे क्षेत्रफळ आणि उपलब्ध जागा कमी झाल्यानंतर क्रिकेटचे सामने घेणे तर दूरच, स्थानिक क्रिकेटसुद्धा पूर्वीच्या पद्धतीने सुरू ठेवणे कितपत शक्य होईल, हा प्रश्न निर्माण झाला आहे...
म्हणजे एका बाजूला ९७ कोटींच्या आसपासचा मोठा खर्च करून स्टेडियमचा कायापालट केला जात आहे आणि दुसऱ्या बाजूला कराडमध्ये अनेक वर्षांपासून चालत आलेल्या अॅथलेटिक्स आणि क्रिकेटसारख्या खेळांसाठीची जागा कमी होत आहे.
सुविधा हव्यात, पण कोणत्या?
माझा विरोध विकासाला नाही. प्रश्न आहे तो विकासाच्या प्राधान्यक्रमाचा.
कराडसारख्या शहरात एकाच मैदानात अनेक खेळांना संधी मिळाली पाहिजे. बॅडमिंटनची पाच कोर्ट असतील, पण त्याचवेळी अॅथलेटिक्सचा ट्रॅक, क्रिकेटचे मैदान, खेळाडूंची सरावाची जागा आणि भविष्यातील क्रीडा गरजा यांचाही विचार झाला पाहिजे...
एका खेळासाठी सुविधा निर्माण करताना दुसऱ्या खेळाची जागा संपवणे, हा क्रीडा विकासाचा योग्य मार्ग आहे का? हा प्रश्न प्रशासनाने स्वतःला विचारायला हवा.
आज पाच बॅडमिंटन कोर्ट उभी राहतील. उद्या आपण अभिमानाने सांगू की कराडमध्ये पाच कोर्ट आहेत. पण काही वर्षांनी या पाचही कोर्टांवर नियमितपणे खेळणारे पुरेसे खेळाडू नसतील, तर या गुंतवणुकीचा अपेक्षित सामाजिक आणि क्रीडा उपयोग किती झाला, याचेही उत्तर द्यावे लागेल.
त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. कराडच्या क्रीडा क्षेत्राचा सविस्तर, शास्त्रीय आणि सर्वसमावेशक अभ्यास झाला पाहिजे. कोणत्या खेळाला किती खेळाडू आहेत, भविष्यात किती खेळाडू तयार होऊ शकतात, कोणत्या सुविधा आवश्यक आहेत आणि उपलब्ध जागेत जास्तीत जास्त खेळांना कशी संधी देता येईल, याचा आराखडा तयार झाला पाहिजे...
कारण स्टेडियम हे केवळ काँक्रीट, कोर्ट आणि पायऱ्यांनी तयार होत नाही.
स्टेडियम म्हणजे खेळाडूंची स्वप्ने, त्यांचा सराव, त्यांचे मैदान आणि त्यांच्या भविष्याची जागा.
म्हणूनच प्रश्न एवढाच,,
कराडला पाच बॅडमिंटन कोर्ट मिळत आहेत, ही नक्कीच चांगली गोष्ट आहे; पण त्या पाच कोर्टांसाठी खेळाडू कुठून आणणार आणि त्यासाठी कराडच्या इतर खेळांचे काय करणार?
हा प्रश्न कुणावर टीका करण्यासाठी नाही.
हा प्रश्न कराडच्या क्रीडा भविष्याचा आहे.....
नईम कागदी

0 Comments