
सत्य सह्याद्री/फलटण
लग्नासाठी स्थळ सुचवून भलत्याच मुलीसोबत बोलायला लावून तब्बल २१ लाख उकळल्याप्रकरणी महिलेविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी एका २७ वर्षीय युवकाने फिर्याद दिली. अश्विनी संदीप शिंदे (रा. वाघोशी, ता. फलटण, हल्ली रा. तलोजा, नवी मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी, सदरची महिला लग्न जमवत असल्याचे समजल्यावर युवकाने संपर्क केला तेव्हा त्या महिलेने सांगितले की, माझ्या नात्यातील एका मुलीनेे गावी आल्यावर तुला पाहिले होते. तुझा स्वभाव आवडला आहे. तेव्हापासून तुझ्यावर प्रेम करत आहे व तुझ्यासाठी तिने दोन वेळा जीव देण्याचा प्रयत्न केला. असे सांगून मुलीचा फोटो दाखवला. त्यावर युवकाने लग्नास होकार दिला. व त्याचे व संबंधीत युवतीचे फोनवरून बोलणे सुरु झाले. त्यावेळी वेळोवेळी तिला कपडे, दागिने, शॉपिंग, लग्नाचा बस्ता, सोन्याचे दुकान टाकायचे आहे, असे सांगून १४ लाख ९४ हजार १०५ असे ॲानलाईन व रोख ६ लाख १ हजार असे २० लाख ९६ हजार १०५ रुपये दिले. नंतर युवकाने आरोपी महिलेला भेटायचे आहे, सांगितल्यावर तिने टाळाटाळ केली. त्यावर शंका आलेल्या युवकाने दिलेल्या पत्त्यावर मुलीच्या वडिलांची भेट घेतली. त्यावर वडिलांनी तू ज्या मुलीशी बोलत आहेस, ती आमची मुलगी नसून दुसऱ्याच कोणाशी तरी बोलत आहे, असे सांगितल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली.

0 Comments