गाव म्हटलं की शेती, गुरंढोर, शेणकचरा, पाला पाचोळा आणि हल्लीच्या युगाचा शाप प्लॅस्टिक आलचं म्हणून समजा. इतर कचरा घराची साफसफाइ, अंगणाची साफ सफाई म्हणून उजाळला जातो मात्र प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग, पाण्याच्या बॉटल, भरमाकोल, हे गाव आणि शिवारात मोठ्या प्रमाणात वाऱ्याबरोबर मस्तीकरत पसरलेला दिसतं. याचा दुरगामी परिणाम आपल्या लक्षात येत नाहीत, पण आता वेळ आली आहे, पावसाळ्यात या प्लॅस्टिकमुळे नाल्या तुंबून पूर येणे, गुरढोरांच्या पोटात चाऱ्याबरोबर प्लॅस्टिक जावून ते मोठ्या प्रमाणात रोगांची शिकार होवून, दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच मातीत प्लॅस्टिक विघटीत होत नसल्यामुळे माती प्रदुषण वाढून मातीची सकसता कमी होण्यास प्लॅस्टिकचा हातभार लागत आहे. हे सर्व टाळण्यासाठी लोकांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे.
सातारा जिल्हा विधायक कामात नेहमीच पुढ राहयला आहे. मग त्यात जलयुक्त शिवार अभियान असो वा स्वच्छता असो यात जिल्ह्याने संपूर्ण राज्याच्या समोर पथदर्शी काम केले आहे. आता घनकचरा व्यवस्थापनेतही कराड तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायतीने खूप मोठी भरारी घेतली आहे. असे काम करणारी ती राज्यातील कदाचित पहिली ग्रामपंचायत आहे. ही ग्रामपंचायत ओल्या कच-या पासून खत करते आहे आणि तो खत १० रुपये प्रती किलो विकला जातो आहे. अर्थात ' घन ' कच-याचे 'धन' कच- यात रुपांतर करुन ग्रामपंचायतीच्या उत्पनाचा नवा आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे आता सातारा जिल्हा परिषदेने याकामी कंबर कसली असून ही ग्रामपंचायत डोळ्यापुढे ठेवून येत्या १ जानेवारीपासून जिल्ह्यातल्या २१७ ग्रामपंचायतीमध्ये घन कचरा व्यवस्थापन आणि प्लॅस्टिक बंदीची सक्त अंमलबजावणी त्या त्या ग्रामपंचायतीला विश्वासात घेवून सुरु करण्याचे नियोजन केले आहे. बनवडीचे काम फक्त जिल्ह्यापुरते मर्यादीत नाही हे राज्याच्या पुढेही जाणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यावर विशेष प्रकाश टाकणारा हा लेख …!!
घनकचरा व्यवस्थापन
जिल्ह्यातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात कार्य केलेल्या ग्रामपंचायतीमध्ये बनवडी ता. कराड या ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापनाबाबतचा प्रकल्प उभारला आहे. बनवडी गावाची लोकसंख्या ही तरंगत्या लोकसंख्येसह 10 ते 12 हजार एवढी आहे तर एकूण कुटुंबसंख्या १८९० असून दररोज १ टन ओला कचरा जमा होत असतो. यामध्ये ग्रामपंचायत परिसरात कुटुंबामार्फत घनकचऱ्याचे वर्गीकरण केले जाते यासाठी प्रत्येक कुटुंबाकडे दोन कचऱ्याचे डबे आहेत. तसेच ग्रामपंचायतीने ग्रामसभा, वार्ड सभा, पत्रकांद्वारे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करुन ओला कचरा साठविण्यासाठी समृद्धी बकेटचे वाटप केले आहे तर सुका कचरा जमा करण्यासाठी मोठ्या पिशव्या देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे निर्मितीच्याच ठिकाणी घनकचऱ्याचे वर्गीकरण करता येणे शक्य झाले आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या घंटागाडीच्या माध्यमातून वर्गीकरण केलेला कचरा जमा करुन नाडेप व गांडूळखत प्रकल्पाच्या माध्यमातून उच्च प्रतिचे खत तयार करण्यात येत आहे. त्यातून ग्रामपंचायतीस उत्पन्नाच्या मार्गाबरोबर ग्रामपंचायत परिसर स्वच्छ सुंदर व आरोग्यदायी राखण्यास मदत झाली आहे.घन कचरा ते धन ( पैसा मिळवून देणारा ) कचरा
घन कच- याच्या गांडूळ खत प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीने २० गुंठे जागा भाड्याने घेतली आहे. त्या जागेचे वार्षिक भाडे ६० हजार रुपये आहे. ओल्या कचऱ्यासाठी गांडूळखताचे १५ बेड उभारणी केली असून त्यासाठी एकूण खर्च ४५ हजार, १०० x३० फुट शेड उभारणी खर्च ६८ हजार रुपये, कर्मचारी माधन दरमहा ९००० x१२ महिने १ लाख ८ हजार असे एकूण वार्षिक खर्च 2 लाख 81 हजार.गांडुळखत प्रकल्पाचे वार्षिक उत्पन्न
एका बेडचे गांडुळ 20 की x200 रुपये एकूण 4 हजार रुपये, एका बेडचे व्हर्मी वॉश 20 ली x 100 रुपये एकूण 2 हजार, एका बेडचे गांडुळ खत 1 टन x 10 रुपये प्रती किलो 10 हजार रुपये एका बेडचे एकूण उत्पन्न 16 हजार असे एकूण वार्षिक उत्पन्न 9 लाख 60 हजार रुपये.ओला कचरा
बनवडी ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छतेची मोहिम गांर्भीयाने हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याची संकल्पना आता प्रत्यक्षात आली आहे. सुका कचरा व ओला कचरा वर्गीकरण करुन दर्शविलेल्या गाडीत टाकावा, हे आवाहन आता लोकांच्या अंगवळणी पडले आहे.नागरिकांना जवाबदारीची जाणिव
कचऱ्याच्या बकेट घंटा गाडी न आल्यास रस्त्यावर वा इतरत्र टाकू नये. अपार्टमेंटमध्ये नागरिकांनी पार्कींगमध्ये कचऱ्यासाठी स्वतंत्र मोठ्या बकेट ठेवाव्यात. ओला कचरा कुजवून झाडे व बागेसाठी खत तयार करावे, प्लॅस्टिक, काच, लोखंडी वस्तु पुनर्वापर करावा, कचऱ्यामध्ये टाकू नये. घराबाहेर पडताना कापडी पिशवी जवळ बाळगावी. नागरिकांनी घर, परिसर, गाव, स्वच्छ राहण्यासाठी सहाकार्य करावे. विद्रुपी करण थांबवावे व जागरुक नागरिक व्हावे. कमीत कमी कचरा करणे व ज्याने कचरा केला आहे त्याच्यावर त्या कचऱ्याची व्यवस्थापनाची जबाबदारी टाकणे व या मार्गाचा जगभरात अनेक ठिकाणी अवलंब केला जातो. लोकांनी व्यसनमुक्त रहावे. त्यामुळे रोगराई होत नाही. गुटखा व तंबाखू खाणाऱ्यानी रस्त्यावर व इतर सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, अशा सचूनाही ग्रामपंचायतीने नागरिकांना केल्या आहेत, आणि त्या आता संपूर्णपणे अंगिकारल्या जात आहेत. इथल्या नागरिकांना स्वच्छता ही सर्वानी मिळून ठेवावी लागते , तो सामुहिक अविष्कार आहे, याची जाणिव झाली आहे.सांडपाणी व्यवस्थापन
मुळात या गावानी मीटर पध्दतीने पाणी द्यायला सुरुवात केल्यानंतर सांडपाण्याच्या व्यवस्थापनाबाबत अतिशय शास्त्रीय पध्दतीने सांडपाण्यावर प्रक्रीया करुन हे पाणी परसबाग फुलविण्यासाठी वापरले जात आहे. शोषखडे तर केलेच आहेत मात्र प्रक्रीया केलेले पाण्यावर चक्क केळीची बाग फुलवली जात आहे, हे विशेष.जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे ' मिशन कचरा व्यवस्थापन '
या प्रकल्प पहाणी दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे म्हणाले, बनवडी गावाची स्थायी लोकसंख्या ही 5 हजार असून तरंगती लोकसंख्या 4 ते 5 हजार आहे. बनवडी ग्रामपंचायतीने सुखा व ओला कचरा वेगवेगळा गोळा करुन घनकचरा व्यवस्थापनाचा उत्तम उदाहरण इतर ग्रामपंचातींपुढे ठेवले आहे. या ग्रामपंचायतीने आल्या कचऱ्यापासून गांडुळखत प्रकल्प उभा केला आहे. ग्रामपंचायतीने 25 बेड तयार केले आहे. प्रत्येक बेडला 3 हजार रुपये खर्च झाला आहे. ग्रामपंचायत चांगल्या प्रकारे गांडूळख तयार करुन 10 रुपये किलोने विकत आहे. खत चांगले असल्यामुळे शेतकऱ्यांमधून खताची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. बनवडी ग्रामपंचायतीला कृष्णा नदीतून 12 लाख लिटर पाणी दिले जाते. त्याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर 7 ते 8 लाख लिटर पाणी खराब निघते. हे पाणी गावाच्या उतार जागेवर शोष खड्डे तयार करुन तसेच विहिरींच्या बाजुला मुरवून या पाण्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो. या बनवडी ग्रामपंचायतीने परसबाग तयार करुन यामध्ये केळी तसेच शेवग्याची झाडे लावली आहेत. अशा प्रकारे प्रत्येक ग्रामपंचायतीत घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प राबवावा यासाठी 4 ते 6 डिसेंबर या कालावधीत जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, ग्रामसेवक यांची कार्यशाळा आयोजित केली होती. यामध्ये घनकचरा व्यवस्थापनाचे नियम या विषयी माहिती देण्यात आलेली आहे. येत्या 1 जानेवारी पासून 217 ग्रामपंचायतींमध्ये अशा प्रकारचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. आत्ताच्या घडीला जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतींनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरु केला आहे. कापडी तसेच कागदी पिशव्या वापरण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार असून पिशव्या तयार करण्याचे काम स्थानिक महिला बचत गटांना देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये प्लॅस्टिक बंदीचा कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिंदे यांनी यावेळी सांगतले.
खूप आनंदाची गोष्ट
बनवडी ग्रामपंचायतीने आल्या कचऱ्यापासून गांडूळखत निर्मितीचा प्रकल्प सुरु केला आहे. गावातील सांडपाणी आम्ही शोषखड्डे घेवून जिवरण्यास सुरुवात केली आहे. परसबाग तयार करुन यामध्ये केळी व शेवग्याची झाडे लावली आहेत. बनवडी गावाची इतर ग्रामपंचायतीचे सदस्य येवून पाहणी करत आहेत खूप आनंदाची गोष्ट आहे.- उषा करांडे, सरपंच
बनवडी ग्रामपंचायतीने ओला व सुक्या कचऱ्याची जी योजना राबवली आहे ती अतिशय चांगली आहे. यापुर्वी आम्ही कोठेही कचरा टाकत होते. ग्रामपंचायतीने ओला व सुक्या कचऱ्यासाठी वेगवेगळ्या गाडी पाठवतात. यामुळे आमचा परिसर स्वच्छ व सुंदर झाला आहे.
मिनाक्षी सपकाळ, ग्रामस्थ बनवडी
100 ते 150 कुटुंबाचे सांडपाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत होते. या पाण्यावर आम्ही परसबाग तयार करुन यामध्ये केळी व शेवग्याची झाडे लावली आहेत. आमच्या बनवडी गावातील 99 टक्के सांडपाण्याचा प्रश्न सुटला आहे.
नितीन साठे, ग्रामपंचायत सदस्य
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बनवडी गावचे घनकचरा व्यवस्थापनाचे काम चांगले आहे. अशा प्रकारचा प्रकल्प मी माझ्या गावात राबवणार आहोत.
धनंजय ताटे
दृष्टीक्षेपात बनवडी
* लोकसंख्या ५१८३ , फ्लोटींग तेवढीच* कृषी क्षेत्र २७० हेक्टर ,
* इरिगेशन २०० हेक्टर
* ९ एकरात गावठाण , एक इंजिनिअरिंग , एक सायंस कॉलेज सह .....
* पाणी पुरवठा २४ × ७ , झिरो अपव्यय
* ९० टक्के पाणी बीलाची वसुली
* भूमिगत गटार आणि त्या पाण्यावरही प्रक्रीया
युवराज पाटील, जिल्हा माहिती अधिकारी , सातारा





0 Comments