Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र स्कूटर्स तातडीने सुरु करा, आ. शिवेंद्रराजेंची मागणी


सातारा@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र स्कूटर्स ही एक जुनी आणि महत्वाची कंपनी आहे. मात्र या कंपनीचे कामकाज सध्या बंद आहे. सदर कंपनीबाबत सरकार आणि बजाज यांच्यात लवादाकडे अनेक वर्ष खटला सुरु होता. खटल्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निकाल श्री. बजाज यांना मान्य आहे. मात्र महाराष्ट्र सरकार सदर निकालाच्या विरोधात सवौंच्च न्यायालयात गेल्याचे समजते. सातार्‍यातील उद्योजकता आणि रोजगारनिर्मीतीची निकड पाहता महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी तातडीने सुरु होणे आवश्यक आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घेवून सदर कंपनी त्वरीत सुरु करावी, अशी आग्रही मागणी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खा. शरद पवार यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात आ. शिवेंद्रराजे यांनी ना. फडणवीस आणि खा. पवार यांना निवेदन दिले असून यासंदर्भात सविस्तर चर्चाही केली. महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीचा प्लांट बंद असल्याने या कंपनीवर अवलंबून असणारे अनेक लहान- लहान उद्योग सध्या बंद आहेत. यामुळे बेरोजगारीची समस्या जटील बनली आहे. हे लहान- लहान उद्योग सुरु झाल्यास सातार्‍यातील औद्योगिकरणास चालना मिळणार असून बेरोजगारी नष्ट होण्याबरोबरच संबंधीत उद्योगाशी निगडीत कुटूंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सुटणार आहे. महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी पुन्हा सुरु झाल्यास सातारा येथील सुशिक्षित आणि गरजू बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीच्या विरोधातील सर्वोच्च न्यायालयाकडील अपील माघारी घ्यावे. याबाबत श्री. बजाज यांच्याशी चर्चा व वाटाघाटी करुन शासनस्तरावर महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीचा प्लांट लवकरात लवकर सुरु व्हावा, याबाबत राज्य सरकारने ठोस निर्णय घेणेबाबत आपण दोघांनी स्वत: लक्ष घालावे आणि औद्योगिकरण आणि बेरोजगारीशी निगडीत प्रश्‍न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी आ. शिवेंद्रराजेंनी केली आहे. 

Post a Comment

0 Comments