सातारा @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा जिल्ह्यात सातारा, केसुर्डी, लोणंद, तासवडे, शिरवळ याठिकाणी मोठमोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. या वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. येथील उद्योजकांना उद्योगासंदर्भातील सरकारी परवानग्या तसेच अन्य शासकीय कामासाठी कोल्हापूरला जावे लागते. सातारा जिल्ह्यात मोठे औद्योगिक क्षेत्र असल्याने सातारा एमआडीसीमध्येच विभागीय कार्यालय (रिजनल ऑङ्गिस) आणि सुसज्ज असे उद्योग भवन उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी आ.शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस आणि खा. शरद पवार यांच्याकडे केली.
यासंदर्भात आ. शिवेंद्रराजे यांनी ना. फडणविस आणि खा. पवार यांना निवेदन दिले असून यावेळी मासचे पदाधिकारी राजेश कोरपे, धैर्यशील भोसले, राजेंद्र रानडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सातारा जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत लहान- मोठे उद्योग व्यवसायांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एमआयडीसी मध्ये सध्या सुरु असलेले आणि नव्याने वाढलेले लहान- मोठे उद्योग, कारखाने व कंपन्या यांना व उद्योजकांना सर्वप्रकारच्या सोयी- सुविधा मिळाव्यात तसेच त्याची शासनाशी संबंधीत सर्वप्रकारची कामे लवकर व्हावीत, परवाने तातडीने मिळावेत यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी सातारा औद्योगिक वसाहतीत सुसज्ज असे उद्योग भवन आणि विभागीय कार्यालय असणे आवश्यक आहे. अशी जिल्ह्यातील सर्वच उद्योजकांची मागणी आहे. यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करुन देण्यास सातारा जिल्हा उद्योग केंद्राचीही तयारी आहे.
विविध परवानग्या व शासकीय कामासाठी सातारा जिल्ह्यातील उद्योजकांना कोल्हापूरला जावे लागते. त्यामुळे उद्योजकांचा वेळ आणि पैसा वाया जातो. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील एमआयडीसीमधील उद्योजकांना सोयी- सुविधा मिळवून देणारे उद्योग भवन आणि विभागीय कार्यालय सातारा औद्योगिक वसाहतीत स्थापन करण्यासाठी आपण प्रयत्न करावा आणि हा प्रश्न मार्गी लावावा, अशी आग्रही मागणी आ. शिवेंद्रराजे यांनी मुख्यंमत्री ना. ङ्गडणविस आणि खा. शरद पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. यावेळी यासंदर्भात सविस्तर चर्चाही झाली. सातारा जिल्ह्यातील उद्योकांची गैरसोय टाळण्यासाठी सातारा औद्योगिक वसाहतीत सुसज्ज असे उद्योगभवन आणि विभागीय कार्यालय स्थापन करण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन ना. फडणविस आणि खा. पवार यांनी यावेळी दिले.

0 Comments