फरार आरोपीसाठी पोलिसांचा थरारक पाठलाग - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, September 26, 2018

फरार आरोपीसाठी पोलिसांचा थरारक पाठलाग


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क


फलटण : सातारा, पुणे ग्रामीण, व सोलापूर ग्रामीण पोलिसांना विविध गुन्ह्यात फरार असलेला फलटण येथील ज्ञानेश्‍वर उर्फ माऊली बापू चव्हाण या अट्टल गुन्हेगारास उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने पाठलाग करून अटक केली. त्यामुळे या तीनही जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होणार आहे.



ज्ञानेश्‍वर उर्फ माऊली बापू चव्हाण (वय 22) रा. शेरे शिंदेवाडी(ता. फलटण) याच्यावर सातारा तालुका, फलटण ग्रामीण, फलटण शहर, बारामती शहर, सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते या पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये विविध प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. अनेक दिवस तो पोलिसांना गुंगारा देवून फरार होता. मंगळवारी सातारा, पुणे व सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला फरारी आरोपी ज्ञानेश्‍वर उर्फ माऊली चव्हाण हा कोळकी( ता. फलटण) परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार फलटण   उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला होता. त्यानुसार संशयित ज्ञानेश्‍वर उर्फ माऊली चव्हाण पोलीस पथकाच्या निदर्शनास आला. सापळा लागल्याचे लक्षात आल्यानंतर ज्ञानेश्‍वरने दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलीस जवानांनी त्याचा थरारक पाठलाग करीत त्याला ताब्यात घेतले.  दरम्यान, संशयित आरोपी ज्ञानेश्‍वर उर्फ माऊलीकडून 220 सीसी ची एक पल्सर मोटरसायकल ताब्यात घेण्यात आली असून त्याने दोन जबरी चोरी, तीन दुचाकी चोरी तसेच एकाला गंभीर मारहाण केल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्यावर याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून या अटकेमुळे सातारा, पुणे व सोलापूर ग्रामीण हद्दीत घडलेल्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होणार आहे. 

No comments:

Post a Comment