Hot Posts

6/recent/ticker-posts

जिहे-कठापूरचे पाणी येण्याआधीच माणमध्ये फटाके, अभिनंदन अन सोशल मीडियावर वॉर


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा :  मूळची जिहे-कठापूर योजना व नव्याने नामकरण झालेली कै. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या वाढीव निधीला मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी 1330 कोटी रुपयांना मंजूरी देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात तो निधी मिळालेला नाही. केवळ निधी देण्यास मान्यता आहे. अजून माणमध्ये या योजनेचे पाणी येण्यास बरेच दिवस आहेत. मात्र, इकडे पाणी येण्याअगोदर माणमध्ये जोरदार श्रेयवाद उफाळला आहे. आमदार जयकुमार गोरे व समर्थकांनी पाणी आल्याच्या थाटात फटाके आनंदोत्सव साजरा केला तर दुसरीकडे माजी आमदार दिलीप येळगावकर व अनिल देसाई यांनीही केलेल्या पाठपुराव्याचे दाखले सादर केले. त्यांच्याही कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. या पाण्यावरून सोशल मीडियावर चांगलेच वॉर रंगले. मात्र, सर्वसामान्य नागरिक काही काळ जिहे-कठापूरच्या न आलेल्या पाण्यात डुबकी मारून वर आले आणि पाणी येईल, तेव्हा खरे, अशा सावध प्रतिक्रिया जनतेतून उमटल्या.
सातारा निवृत्त अभियंता मंडळ व माजी सैनिक संघटना यांनी तयार केलेली व डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी मोठा पाठपुराव केलेल्या या योजनेला 11/2/1997 रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यावेळी ही योजना केवळ 269.07 येवढ्या रक्कमेची होती. युती सरकारने 1997 साली ही योजना सुरू केली. मात्र, त्यानंतर आलेल्या आघाडी सरकारने हे काम बंद पाडले त्यानंत या योजनेसाठी अनेकांनी पाठपुरावा केला, आंदोलनेही केली.  दि 6/11/2017 रोजी या योजनेला  1085.53 येवढ्या रकमेच्या पहिल्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंजुरी मिळाली. त्यानंतर खटाव तालुक्यातील दरुज दराजाई तलावापासून सातेवाडी पेडगाव मांडवेसह, एनकुळ कनसेवाडी, या 17 गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला.  मंगळवारी 20/8/2019 दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य सरकारने दिली. यासाठी राज्य सरकारने 1330 कोटी रुपये निधीच्या खर्चाला मान्यता दिला.
आता महिनाभरात निवडणुकांचे धुमशान सुरु होईल, असा गाजावाजा खटाव-माण वासियांना नवा नसून योजनेचे श्रेय कुणाचे हे जनतेला चांगले माहित आहे. केवळ पेपरबाजी, बॅनरबाजी आणि फ्लेक्सबाजी करणार्‍यांमुळे जनतेपर्यंत चुकीची माहिती पोहोचत असून त्यामुळे तालुक्यात उलट-सुलट चर्चा रंगत असली तरी पाणी येईल तेव्हाच खरं अशी सावध प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे.

Post a Comment

0 Comments