सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पुणे : एल्गार प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविल्याच्या पार्श्वभूमीवर एनआयएचे आठ जणांचे पथक पुणे पोलीस आयुक्तलयात सोमवारी दाखल झाले असून, त्यांनी पुणे पोलिसांकडून तपासाबाबतची माहिती घेत सार्वजनिकरीत्या उपलब्ध करण्यात आलेली तक्रार आणि दोषारोपपत्राची कागदपत्रे मिळवली आहेत. परंतु, मुख्य तपासाची मूळ कागदपत्रे ही राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून पुणे पोलीस आयुक्तांना लेखी कळविल्यानंतर आणि कायदेशीर बाबींच्या पूर्ततेनंतर एनआयएला सोपवली जातील तसेच एनआयएला तपासात सहकार्य केले जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी मंगळवारी दिली.
‘एल्गार’च्या तपासाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी एसआयटी नेमण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने हा तपास एनआयए या देशातील सर्वोच्च तपास यंत्रणेकडे हलवला. याबाबतचे लेखी पत्र एनआयएच्या पथकाने पुणे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांना भेटून दिले. परंतु, एनआयएमार्फत राज्याचे पोलीस महासंचालक यांना पत्रव्यवहार झाल्यानंतर राज्य सरकार याबाबत निर्णय घेऊन पुढील आदेश देईल. एल्गार प्रकरणाची सुनावणी ही पुणे सत्र न्यायालयात सध्या सुरू असून याप्रकरणात देशभरातील विविध राज्यातूून नक्षलवादाशी संबंधित संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. याबाबत पुणे पोलिसांनी दोन दोषारोपपत्रे न्यायालयात दाखल केली असल्याने त्यात गुन्ह्याचा सविस्तर तपास देण्यात आला आहे. तसेच काही पुराव्यांची कागदपत्रे न्यायालयातही दाखल करण्यात आलेली आहे. या केसचे तपास अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी याप्रकरणात सर्वौच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयात आतापर्यंत वेगवेगळी कागदपत्रे सादर करत केसमधील महत्त्वपूर्ण बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने अद्याप या गुन्ह्यातील कोणत्याही आरोपीस जामीन मिळू शकलेला नाही. गुन्ह्यातील आरोपींवर बेकायदेशीर हालचाल प्रतिबंधक कायदा (युएपीए) कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारने एल्गार केसचा तपास परस्पर एनआयएकडे तपास सोपवल्याने केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा सामना रंगला आहे.
एल्गार प्रकरणाचा कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराशी संबंध असल्याचा दावा करत पुणे पोलिसांनी याप्रकरणात नक्षलवादी हितसंबंध असल्याच्या अनुषंगाने 22 जणांवर गुन्हा दाखल केला असून, आतापर्यंत एकूण नऊ जणांना अटक केली आहे. यामध्ये मुंबईतील सुधीर ढवळे, अंधेरीतील व्हर्णन गोन्सालवीस, बांद्य्रातील अरुण फरेरा, हैद्राबाद येथील पी. वरावरा राव, हरियानातील सुधा भारद्वाज, दिल्लीतील रोना विल्सन, नागपूरचे अॅड. सुरेंद्र गडलिंग, प्रा. शोमा सेन, चंद्रपूरचा महेश राऊत यांचा समावेश आहे. याप्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी गौतम नवलखा (दिल्ली), आनंद तेलतुंबडे (गोवा), स्टॅन स्वामी (झारखंड), हर्षाली पोतदार (मुंबई) या आरोपींकडे यापुढील काळात एनआयए तपास करणार आहे.

0 Comments