सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पाटण: तालुक्यात सोमवारी रात्री उशिरा आचरेवाडी येथील एका 35 वर्षे पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. आता एकूण कोरोना बाधितांची संख्या 81 झाली आहे. यापैकी आत्तापर्यंत 60 व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या 17 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती उप विभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील यांनी दिली.तालुक्यात आत्तापर्यंत 36 गावातील 81 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून 60 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत 22 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. सध्या काळेवाडी (अडूळ), दिवशी (मारूल) , धामणी, शिरळ, उरूल, गोवारे, हावळेवाडी, कराटे, शेजवळवाडी, डिगेवाडी, पाळेकरवाडी, कोयनानगर, बागलवाडी, आचरेवाडी या 14 गावातील 17 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 15 व्यक्तींवर कृष्णा हॉस्पीटल, कराड व दोघांवर सिव्हिल हॉस्पीटल, सातारा येथे उपचार सुरू आहेत. सोमवारी नव्याने आचरेवाडी येथील 35 वर्षे वयाच्या पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्याला तातडीने पुढील उपचारासाठी कृष्णा हॉस्पीटल, कराड येथे दाखल करण्यात आले. याशिवाय या बाधितांच्या संपर्कातील कुटुंबीय व नातेवाईक आदी हाय रिस्कमधील व्यक्तींना येथील प्रियदर्शनी महिला वसतीगृह, मिल्ट्री बॉइज होस्टेल तसेच कोरोना केअर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. सध्या विलगीकरण कक्षात एकूण 63 व्यक्तींना ठेवण्यात आले आहे. मंगळवारी नव्याने आणखी 9 व्यक्तींचे स्वॅब नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत सध्या एकूण 33 व्यक्तींचे स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. यापैकी काहींचा मंगळवारी तर काहींचा बुधवारी रात्री उशिरा अहवाल येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

0 Comments