Hot Posts

6/recent/ticker-posts

कोयना पात्रात बोट चालविण्याचे प्रशिक्षण


पाटण येथे स्थानिक तरुणांना बोट चालविण्याचे प्रशिक्षण देताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी.

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पाटण:  गतवर्षी राज्यात पावसाने हाहाकार माजवल्याने अनेक गावे पाण्याने वेढली होती. शहरासह तालुक्यातही पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बोट उपलब्ध नसल्याने बाहेर काढणे कठीण झाले होते. गतवर्षाची पुनरावृत्ती यावर्षी होऊ नये म्हणून संवेदनशील ठिकाणी जिल्ह्यात बोटी देण्यात आल्या आहेत. पाटण तालुक्यालाही अतिवृष्टी व पूरपरिस्थितीच्या काळात सामना करण्यासाठी कायमस्वरूपी 2 बोटी देण्यात आल्या असून बोटी चालवणार्‍यांना प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून पाटण तालुक्याला आपत्कालीन परिस्थितीसाठी बोटी व लाईफ जॅकेट देऊन येथील कोयना नदीमध्ये त्याचे प्रशिक्षण स्थानिकांना देण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, नायब तहसिलदार प्रशांत थोरात, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, सपोनि तृप्ती सोनावणे, पाटणचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, नगराध्यक्ष संजय चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
ताम्हणे म्हणाले, गतवर्षी तालुक्याच्या सर्व विभागात पावसाने थैमान घातले होते. कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना, केरा नद्यांच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली होती. शहरात अनेक घरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली. स्थलांतरीत होण्याच्या सूचनाही केल्या होत्या. मात्र अनेक लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने ते घरातच अडकून पडले होते. केरा पुलानजिक असणारा पशुवैद्यकीय दवाखाना पाण्याखाली गेला होता. तर स्मशानभूमीकडे जाणार्‍या परिसरातही 20 फूट पाणी आले होते. येथे घराच्या वरच्या मजल्यावर अडकलेल्या लोकांना गाडीच्या ट्यूबद्वारे बाहेर काढण्यात आले होते.केरा पुलापासून ते जुना बसस्थानक, झेंडाचौक, धांडे पूल, नवीन बसस्थानक, कळके चाळ, रामापूर, ग्रामपंचायतीची जुनी इमारत, मार्केट यार्ड असा सर्व परिसर पुराच्या पाण्याखाली गेला होता. त्याचबरोबर पाटण तालुक्याच्या विविध गावांनाही पुराने वेढा दिला होता.
कराड ते चिपळूण मार्गावर ठिकठिकाणी पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता. त्यावेळी बोट उपलब्ध नसल्याने विविध ठिकाणच्या लोकाना बाहेर काढताना प्रशासकीय यंत्रणेला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. गतवर्षीप्रमाणे यावर्षी अडचणी उद्भवू नये म्हणून गतवर्षीचा विचार करून जिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामार्फत पाटण तालुक्यात पोहणार्‍या जवानांची पथके तयार करण्यात आली असून त्यांना बोटी व लाईफ जॅकेट देऊन येथील कोयना नदीत प्रशिक्षण देण्यात आले. या बोटीचे वजन 125 किलो आहे. बोटीतून एका वेळेस 10 व्यक्तींना घेवून जाता येते. तसेच याचे इंजिन फोरस्ट्रोक असून पेट्रोल आणि ऑईल मिक्स करून वापरावे लागते. गतवर्षासारखी आपत्ती यावेळी उद्भवल्यास या बोटीमुळे नागरीकांना बाहेर काढणे सोयीस्कर होणार आहे. यासह प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयात चोवीस तास आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला असून आपत्तीची माहिती याठिकाणी घेतली जाणार असल्याचेही ताम्हणे यांनी शेवटी सांगितले.
यावेळी मंडलाधिकारी पी. एल. गाडे, आनंदराव संकपाळ, पी. जे. ब्रम्हे, व्ही. एम. कुंभार, एच. डी. शेजवळ, तलाठी जयेश शिरोडे, भरत जाधव, पढंरीनाथ शिंदे, ए. व्ही. घाडगे, के. एस. देवकर, पंचायत समिती बांधकाम विभागाचे शाखा अभियंता हराळे, भोसले, विस्तार अधिकारी आर. के. गायकवाड, टी. पी. थोरात, दुमणे, ग्रामसेवक सुनिल कांबळे, सी. डी. साळुंखे, डी. बी. कांबळे, प्रविण सूर्यवंशी, श्रीमती बांगर, भरत राठोड, सुनिल केदारी यांच्यासह ग्रामसेवक, महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments