Hot Posts

6/recent/ticker-posts

मोने.. हे वागणं बरं नव्हं: माधवी कदम


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा:  मार्केट कमिटीचा सचिव मनवे याला लाचखोरच्या आरोपात अटक करण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन मार्केट कामिटीच्या सभापतीचा नगरसेवक मोने यांनी सातारचे खर्‍या अर्थाने हित पाहणारे  नागरिक म्हणून त्यावेळी राजीनामा मागितला असता तर त्यांना आज माझा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार होता. तथापि, आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचं ते कार्ट अशी दुटप्पी भूमिका असलेल्या अशोक मोने यांनी  स्वतः त्यांच्या नगरसेवक पदाचा राजीनामा दयावा आणि मग माझ्या राजीनाम्याबाबत वाच्यता करावी, अशा शब्दात नगराध्यक्षा माधवी कदम  मोने यांना फटकारले आहे.
याबाबत  कदम यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे की, वास्तविक एक चांगले व्यक्तीमत्व म्हणून मोने यांना ओळखतो. नगरपरिषदेच्या कामकाजात आम्ही सर्व नगरसेवक नेहमीच अशोक मोने आणि त्यांच्या सहकारी नगरसेवकांशी विचारविमर्श करीत असतो. अश्या अशोक मोने यांनी मला गांधारीची उपमा दिली. महाभारतातील गांधारीने तिचा राजा असलेला पती अंध होता म्हणून डोळयावर पट्टी बांधली होती. आज माझे पती ना राजा आहेत ना अंध आहेत, त्यामुळे ही उपमा मला लागू होत नाही. त्यांना कदाचित दुसर्‍यांबाबत बोलायचे असेल पण, ते बोलता येत नसेल म्हणून त्यांनी  उचलली जीभ लावली टाळ्याला असा खटाटोप केल्याचे दिसत आहे.
गांधारीची उपमा मला नाही तर तुम्हालाच लागू होते. सातारकरांच्या हिताचा तुम्हास कधीही न जमलेला विकास खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा विकास आघाडीने केला आहे.
तो तुम्ही डोळयावर पटटी बांधल्याने दिसत नाही. त्यामुळे गांधारी कोण आहे हे जनतेला वेगळे सांगायची आवश्यकता नाही. शासनाकडून वेगवेगळया योजने संदर्भात आलेला निधी ज्या त्या योजनांवर रितसरपणे सातारकरांचे लोकहित लक्षात घेवून,  विनियोगात आणण्यात येत असतो, हे मोने यांना माहीती नाही याचे फार मोठे आश्‍चर्य वाटते. त्यामुळे अशोक मोने यांनी  डोळसपणे काही गोष्टी पहाव्यात असे माझे सांगणे आहे. 
सातारकरांमध्ये क्लिपा व्हायरल झाल्या आहेत असे मोने सांगत आहेत.  मोने यांनी माझ्याबाबतीत किंवा आमच्या आघाडीच्या बाबतीतील तथाकथित क्लीप सिध्द करुन दाखवावी आणि मगच याबाबतीत आपले मतप्रदर्शन करावे, कोणाची क्लिप, कोण कोणाची नावे घेतो, याचा प्रत्यक्ष संबंध मोने यांनी जोडून सिध्द करुन दाखवावा. उगाच हवेत गोळया मारुन स्वतः हिरो असल्यासारखा बालीशपणा त्यांनी दाखवू नये. सध्या ही बाब न्यायप्राविष्ट  आहे. त्याबाबत आज वक्तव्य करणे योग्य होणार नाही. आमचा न्याययंत्रणा आणि पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्‍वास आहे, असेही माधवी कदम यांनी पत्रकात म्हटले आहे.
सध्या साविआ-नविआत चांगलेच पत्रकयुद्ध रंगले आहे.

Post a Comment

0 Comments