मायणी :-
अखेर दैनिक सत्य सहयाद्रीतुन व्यक्त केलेली भीती खरी ठरली असून खचलेल्या पर्यायी माती भरावांच्या रस्त्याची संबंधित ठेकेदारांने केलेली चुकीची मलमपट्टी ही चांद नदीच्या वाढलेल्या प्रवाहाला थोपवू शकली नाही यामुळे हा रास्ता पाण्याच्या दाबाने वाहून गेला असून मल्हारपेठ पंढरपूर हा राज्यमार्ग वरील वाहतूक बंद झाली असून ग्रामस्थांनी यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
गेल्या दोन दिवसांपूर्वी दैनिक सत्य सह्याद्री मधून मल्हारपेठ -पंढरपूर या राज्यमहामार्गावर मुख्य गावाच्या दोन्हीबाजूला असणाऱ्या पुलाच्या कामाविषयी व निकृष्ट खचलेल्या पर्यायी मातीच्या भरावाचा रास्ता वाहून जाण्याची शक्यता व्यक्त केली होती. वाढलेल्या चांद नदीच्या प्रवाहामुळे चांदणी चौक मधील भराव रास्ता खचला होता . यावर एक डपंर ही अडकून पडला होता परंतु हा रास्ता वाहतुकीसाठी बंद करून जुन्या पुलावरून पोलिसांनी वाहतूक सुरू ठेवली होती.
परंतु बातमीच्या माध्यमातून संबंधित ठेकेदाराला भराव रस्त्याच्या पाण्याला प्रवाहित करण्यासाठी टाकलेल्या फक्त दोन पाईप ची संख्या वाढवून सहा करण्याची गरज असल्याची माहिती दिली होती. परंतु भवानीमंदिर परिसरातील मुख्य जुना पूल नवीन निर्मिती करण्यासाठी तीन ते चार महिन्यापूर्वी तोडण्यात आला होता.तर पर्यायी वाहतूक चांद नदीवर फक्त दोन पाईप टाकून मातीचा रस्ता तयार करण्यात आला होता . हा रास्ता तीन दिवसांपूर्वी नदीच्या वाढलेल्या पाण्याने खचू लागला होता. संबंधित ठेकेदाराने पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी पाईप ची संख्या न वाढवता भराव टाकून रस्त्याची रुंदी वाढवण्यावर भर दिला . या चुकीच्या पद्धतीने पाण्याचा फुगवटा वाढून आज सकाळी पाण्याचा दाब वाढून हा 'मजबूत' केलेला प्रवाह वाहून गेला .
आज कलेढोण ,कुकुडवाड,म्हसवड,दिघजी,अकलूज पंढरपूर कडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून सध्या हा रास्ता पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने सुरळीत करणे अवघड आहे. वेळीच संबंधित ठेकेदाराने योग्य ती उपाययोजना केली असती तर हा राज्यमहामार्ग बंद होण्याची वेळ आली नसती.
खचलेला पूल दुरुस्त करण्यासाठी आम्ही भरावाची रुंदी वाढवली परंतु पाण्याचा दाब वाढल्याने हा भराव वाहून गेला आहे. आता आम्ही मोठ्या पाईप मागवल्या असून या पाईपची संख्या वाढवून रस्ता वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत- नवनाथ मिसाळ, कामाशी संबंधित व्यक्ती.
दैनिक सत्य सहयाद्री ने दोन दिवसांपूर्वी प्रकाशित केलेल्या वृत्ताची भीती खरी ठरली असून बातमीत असलेल्या उल्लेखाप्रमाणे पाईप संख्या वाढवणे गरजेचे असताना ठेकेदाराने भराव टाकण्याचा चुकीचा पर्याय केल्याने आज मल्हारपेठ पंढरपूर रास्ता वाहून जाऊन वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे, अनेक दिवस वेळ असूनही या पुलाचे काम संबंधित ठेकेदार पूर्ण करू न शकल्याने या पुलाची वाताहत झाली आहे. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने हे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. - शिवाजी कणसे ,ग्रामस्थ मायणी

0 Comments