सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पुसेसावळी: खटाव तालुक्यातील वडगाव (ज. स्वा) येथे मध्यरात्रीच्या सुमारास सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तो अयशस्वी ठरला. शाखेच्या खिडकीचे ग्रिल तोडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. तिजोरी न तुटल्यामुळे चोरटे पसार झाल्याने अनुचित प्रकार टळला.
याबाबत घटनास्थळावरून व पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री एक ते दीडच्या सुमारास जिल्हा मध्यवर्ती बँकेत अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. नंतर त्यांनी सी. सी. टीव्हीचे कॅमेरे बंद करुन तिजोरी फोडण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र, बँकेतील भोेंगा वाजू लागल्यामुळे बँकेच्या अधिकार्यांनी मोबाइल द्वारे गावात मेसेज केले. त्यानंतर गावातील काही ग्रामस्थ बँकेजवळ पोचले.
चोरट्यांना गावातील ग्रामस्थ जागे झाले असल्याचा सुगावा लागल्यामुळे चोरटे तिजोरी न फोडता पसार झाले. ग्रामस्थांच्या व अधिकार्यांच्या तत्परतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला असल्याची चर्चा घटनास्थळी होती. बँकेचे खातेदार शेतकरी व ठेवीदारांचे या वृत्तामुळे मात्र धाबे दणाणले. या दरोड्याच्या प्रयत्नामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. पोलीस प्रशासना बरोबर बँक प्रशानाकडूनही सुरक्षेच्या दृष्टीने सतर्कता गरजेची आहे. ग्रामीण भागातील शाखांमध्ये बँक प्रशासनाने सुरक्षारक्षक नेमणे ही काळाची गरज असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. घटनास्थळी औंध पोलीस स्टेशनच्या अधिकार्यांनी भेट देऊन पाहणी केली. औंध पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत तक्रार दाखल झालेली नव्हती. चोरट्यांचा पोलिसांनी लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

0 Comments