गोंदवले शाळकरी मुलाच्या अपहरणाच्या अफवेने माण तालुक्यात एकच खळबळ उडाली. मात्र पोलीस तपासात हे अपहरण नसल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार मोगराळे घाटातून आदित्य कांतीलाल काळे(वय-२१), स्वाती आर्यन काळे(वय-३१) आणि हृतिक आर्यन काळे(वय-०७) (सर्वजण रा.पारगाव,ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर)हे तिघेजण दुचाकी क्र.एम.एच.१६ सी झेड २२६३ वरून दहिवडीहून फलटणच्या दिशेने निघाले होते. मोगराळे घाटाच्या आसपास गेल्यावर लहान मुल हे गाडीवर झोपी गेले होते. मात्र फलटणकडे जाणाऱ्या काही व्यक्तींना मुलाच्या अपहरणाचा संशय आल्याने त्यांनी त्याची विचारपूस करण्यासाठी गाडी थांबवली. यावेळी आदित्य काळे याने गाडी गर्रकन वळवली आणि दहिवडीच्या दिशेने धावू लागला. त्यामुळे विचारपूस करणाऱ्यांचा संशय अधिकच बळावल्याने त्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. मोगराळे, बिजवडी,वडगाव आणि वावरहिरेमधून तो शिंगणापूरच्या दिशेने भरधाव चालला होता. वावरहिरेमधील लोकांनी संपर्क करून पोलिसांना ही माहिती कळवल्याने शिंगणापूरमध्ये नाकाबंदी करून त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. शिंगणापूरजवळ पोलिसांना बघून मुख्य रस्ता सोडून मोहीच्या दिशेने मधूनच भरधाव सुटला. रस्ता संपल्याने गाडी सोडून हे तिघे जवळपास रानातून पळत होते. पोलिसांनीही त्यांचा उभ्या पिकांतून धावत त्यांचा पाठलाग करून शिंगणापूर-मार्डी रोडवर असलेल्या ठोंबरेवाडी नजीक पकडले.
मात्र आदित्य काळे हा पळून गेला. स्वाती काळे व आर्यन काळे हे पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता स्वाती काळे हिने चितळे डेअरी (भिलवडी,ता.पलूस) येथून ते पैसे घेऊन घरी चालले होते, अशी माहिती दिली. त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यावरून हे अपहरण नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र आदित्य काळे हा पळून गेल्याने त्याची गाडी जप्त करण्यात आली असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
हा पोलीस आणि पळणाऱ्या आदित्य काळे याचा पकडापकडीचा थरार जवळपास दोन तासाहून अधिक चालला. यावेळी ठाणे अंमलदार संदीप खाडे, निर्भया पथकाच्या नीलम रासकर ,महेश सोनवलकर, संतोष वीरकर आदींनी प्रयत्न करून महिलेस व मुलास ताब्यात घेतले.
0 Comments