दहिवडी नगरपंचायत प्रशासकीय इमारतीचा श्रेयवाद उफाळण्याची चिन्हे ; भाजपच्या आजी- माजी नगरसेवकांचा तीव्र विरोध
गोंदवले :
दहिवडी
नगरपंचायत प्रशासकीय इमारतीच्या शुभारंभ बाबत श्रेयवाद उफाळण्याची चिन्ह
निर्माण झाली असून राष्ट्रवादीने स्वतः निधी आणून त्याचे श्रेय घ्यावे असे
माजी नगराध्यक्ष सिद्धार्थ गुंडगे यांनी म्हटले आहे. भाजपचे सर्व आजी-माजी
नगरसेवक यावेळी शरद पवारांना काळे झेंडे दाखवत शरद पवारांना सदर प्रशासकीय
इमारतीचे उद्घाटन करू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
राष्ट्रवादीचे
सर्वेसर्वा खा.शरद पवार हे महाराष्ट्रातील राजकीय सत्ता नाट्यानंतर प्रथमच
माण तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते दहिवडी
नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीचा उदघाटन करणार आहेत. मात्र प्रशासकीय
इमारतीचे भूमिपूजन आ.जयकुमार गोरे यांनी केले होते. भाजपची सत्ता असतानाच
सदर प्रशासकीय इमारतीला मंजुरी मिळाली आणि निधीही आला होता. भाजपच्या
काळातच सदर इमारत बांधून पूर्ण झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीने स्वतः
निधी मंजूर करण्याची धमक असेल तरच श्रेय घेण्याचा उतावळापणा दाखवावा,असा
घणाघात ही सिध्दार्थ गुंडगे यांनी केला आहे.
जिल्हा
नियोजन समितीच्या निधी व्यतिरिक्त इतर कोणताही निधी राष्ट्रवादीचे सरकार
असताना देखील त्यांना मंजूर करून आणता आला नाही. त्यामुळे आमदार जयकुमार
गोरे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या निधीचे श्रेय राष्ट्रवादीने घेणे
थांबवावे. फक्त हिंमत दाखवून निधी मंजूर करत विकास साधावा आणि मग श्रेय
घ्यावे. स्वतः निधी न आणलेल्या विकासकामाचे श्रेय घेत जनतेची दिशाभूल
करण्याचे उद्योग राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थांबवावेत, असा टोलाही त्यांनी
यावेळी हाणला आहे.

0 Comments