गोंदवले : निर्भया पथकाने शाळेत केलेल्या मार्गदर्शनाला यश आल्याची घटना माण तालुक्यातील भालवडीत घडली असून पाच वर्षांपूर्वी झालेल्या गैरवर्तनाची तक्रार अल्पवयीन मुलीने नोंदवल्यानंतर म्हसवड पोलीस ठाण्यात 66 वर्षीय वृद्धाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे. दरम्यान, याच वृद्धाने आणखी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने नोंदवली आहे.
गोरख लाला पाटोळे (वय 66, रा. भालवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या वृद्धाचे नाव आहे. सन 2018-19 साली पीडित मुलगी चौथी व पाचवीत शिकत असताना या वृद्धाने मुलीला घरी बोलावून गालावरून व छातीवरून वाईट उद्देशाने हात फिरवून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले होते. अद्याप संशयिताला अटक करण्यात आली नसून तपास उपनिरीक्षक ए. आय. वाघमोडे करत आहेत.
दरम्यान, दुसरी तक्रार मुलीच्या आईने दिली. पीडित मुलीच्या आईला निर्भया पथकाने म्हसवड पोलीस ठाणे येथे बोलावून घेत मुलीकडे विचारणा करण्यास सांगितल्यावर दुसरी घटना उघडकीस आली. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव काळात गोरख लाला पाटोळे याने गालावरून व छातीवरून वाईट उद्देशाने हात फिरवून विनयभंग केला. तसेच त्यानंतर पाचसहा दिवसांनी ती शेात जात असताना तिला घरी बोलावून मोबाईलमधील अश्लील व्हिडीओ दाखवून तिचे जबरदस्तीने कपडे काढून अंगावरून हात फिरवून विनयभंग केला. तसेच घरी सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
निर्भया पथकाचे कौतुक
दहिवडी उपविभागीय कार्यालयाच्या निर्भया पथकाकडून शाळांमध्ये जागृती कार्यशाळा घेतल्या जातात. याच कार्यशाळेत केलेल्या मार्गदर्शनामुळे पीडित मुलीने न घाबरता समोर येत यासंदर्भातील तक्रार नोंदवली. पोलिसांच्या निर्भया पथकाचे व न घाबरता पुढे आलेल्या पीडित मुलीचे माण तालुक्यात कौतुक होत आहे.

0 Comments