सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण: काठी अन् घोंगडं म्हटलं की आठवण येते ती धनगर समाजाची. लोकसभेच्या माढा मतदारसंघाचा निकाल ठरवण्यात हाच समाज किंगमेकरची भूमिका ठरवणार असून सभेच्या निमित्ताने फलटणला पवारांनी नाकारलेली घोंगडी अन् काठी माळशिरसच्या सभेत मोदींनी मात्र स्वीकारली. आता या घोंगडीची उब कोणाला मिळणार आणि काठीचा फटका कोणाला बसणार? याची चर्चा जोरात सुरु आहे.
फलटण येथील महाविकास आघाडीच्या सभेत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना धनगर समाजाच्या वतीने त्यांना घोंगडी, काठी व भंडारा देत असताना पवारांनी त्याला नकार देत ही घोंगडी धैर्यशील मोहिते - पाटील यांच्या गळ्यात घालायला सांगितली. त्यानंतर दुसर्या दिवशी माळशिरस येथे महायुतीच्या वतीने आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान धनगर समाजाच्या वतीने करण्यात आल्यावर मोदींनी हीच घोंगडी अंगावर घेवूनच आपले भाषण केले. या दोन्ही घटनांमुळे माढा लोकसभा मतदारसंघात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
‘मविआ’च्या सभेत काही धनगर युवक स्टेजवर गेले व धनगर समाजाचा व बिरदेवाचा प्रतीक असणारी काठी घोंगडी व भंडारा भेट दिला मात्र, शरद पवारांनी गुलाबाचा हार स्वीकारला पण काठी घोंगडी व भंडारा स्वीकारला नाही. तो धैर्यशील मोहिते - पाटील यांना देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी अनेकांचे सत्कार शरद पवार यांनी स्वीकारले पण धनगर समाजाचा काठी घोंगडे व भंडारा याचा सत्कार स्वीकारला नसल्याचा संदेश गेल्याचे बोलले जात आहे. या सभेतील कृत्यामुळे धनगर समाजात विविध चर्चा सुरू असताना माळशिरस येथे भाजपाचे लोकसभेचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान धनगर समाजाच्या वतीने करण्यात आला यावेळी त्यांना पिवळा फेटा, घोंगडी, काठी व बाळुमामाची मूर्ती भेट देण्यात आली. मोदींनी घोंगडी अंगावर घेवूनच आपले भाषण व्यक्त केले. येळकोट येळकोट जय मल्हार बाळुमामाच्या नावानं चांगभलं अशी जयघोषाने भाषणाची सुरुवात केली. त्यामुळे आता माढ्यातील धनगर समाजाच्या घोंगडीची उब कोणाला मिळणार आणि फटका कोणाला बसणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 Comments