सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
लोकसभा मतदारसंघाची पुर्नरचना झाल्यानंतर नव्याने माढा मतदारसंघ निर्माण झाला आहे. या मतदारसंघाशी वेगवेगळ्या दिग्गज नेत्यांची नांवे जोडली गेली आहेत. मात्र, या मतदारसंघाने प्रत्येक निवडणूकीत वेगवेगळ्या नवीन चेहर्यांना संधी दिली आहे. यंदा हीच परंपरा पुढे राहणार की विद्यमान खासदार परंपरा मोडणार याकडे राजकीय जाणकारांमध्ये औत्सुक्य आहे.
2009 मध्ये नव्याने निर्माण झालेल्या माढा मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील फलटण, माण तसेच खटाव, कोरेगांव तालुक्यातील काही भागाचा समावेश आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला, माढा, करमाळा, तसेच पंढरपूर मतदारसंघातील काही गावांचा समावेश आहे. या मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर प्रस्थापित राष्ट्रवादी काँग्रेसकडून फलटण तसेच अकलूजचे दिग्गज नेते इच्छुक होते. मात्र दोन्ही संस्थांमध्ये एकमत होत नसल्याने पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार साहेबांच्यावर शेवटी एकमत झाले. नाही म्हणायला त्यावेळी कोरेगांव तालुक्यातील वाठार खोर्यातील नांदवळ हे गांव पवार साहेबांचे मूळ गांव असल्याचा गवगवा होता. दुसर्या बाजूला पवारांच्या विरोधात भाजपाचे सोलापूर शहरातील आमदार सुभाषबापू देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. तर रा.स.प. चे संस्थापक महादेव जानकर अपक्ष लढले होते. त्यावेळी सुभाषबापूंना 2 लाख तर जानकर साहेबांना 1 लाखाच्या आसपास मते मिळाली होती. मतविभागणीचा फायदा घेत पवार साहेबांनी पहिलीच निवडणूक लाखोंच्या फरकाने जिंकली.
2014 च्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवाराची माळ माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील (दादा) यांच्या गळ्यात घातली. भाजपाकडे तगडा उमेदवार नसल्याने तत्कालीन परस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दुसर्या क्रमांकाचे नेते सदाभाऊ खोत यांच्या गळ्यात उमेदवारीचे घोंगडे अडकवले. त्यावेळी सदाभाऊंबरोबर एकही आमदार, प्रमुख पदाधिकारी तसेच कसलीही यंत्रणा नसताना मोदी लाटेच्या जोरावर मोहिते-पाटलांना जोरदार टक्कर दिली. केवळ माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या एकमुखी पाठींब्यावर विजयदादांचा वीस हजारांच्या आसपास मतांच्या फरकाने विजय झाला.
त्यानंतर 2019 च्या निवडणूकीपूर्वी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. त्यामध्ये अकलूजकर मोहिते-पाटलांसह, सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांनी पक्षाला रामराम करुन भाजपाशी घरोबा केला. यावेळी मोहिते-पाटलांचे सुपुत्र व रणजितसिंह मोहिते-पाटील इच्छुक होते. मात्र, फलटणमध्ये भाजपाला त्यावेळी केवळ 20 ते 25 टक्केच मते दिसत असल्या कारणाने स्थानिक उमेदवारीचा फायदा घेण्याच्या दृष्टीने रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आली. अपेक्षेप्रमाणे तसेच झाले. मायनस असणार्या फलटण विधानसभा क्षेत्रात नाईक निंबाळकरांना नाममात्र 1213 मतांचे लिड मिळाले. तर माण मतदारसंघात 23 हजार 215 मतांचे लीड मिळाले. त्यांचे विरोधक संजयमामा शिंदे यांना स्वत:च्या करमाळा तालुक्यात 30 हजार 429, बंधू आ. बबनदादा शिंदे यांच्या माढा मतदारसंघात 6 हजार 505 तर सांगोला मतदारसंघात 3 हजार 374 मतांचे लीड मिळाले. एकमेव माळशिरस मतदारसंघातील तब्बल 1 लाख 630 मताच्या मताधिक्याच्या जोरावर नवख्या रणजित नाईक निंबाळकरांचा विजय संपादन झाला. या निवडणुकीत रणजित नाईक निंबाळकर यांना 5 लाख 83 हजार 191 तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी संजयमामा शिंदे यांना 4 लाख 98 हजार 441 मते मिळाली. त्यामुळे निंबाळकरांचा 84 हजार 750 मताधिक्याने विजय झाला.
तरीही अपेक्षाभंग
माढा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या शरद पवारांना केंद्रीय मंत्रीपद, तर निवडणूक लढविलेल्या सुभाषबापू देशमुख, महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांना राज्याच्या मंत्रीमंडळात संधी मिळाली होती. तर दस्तूरखुद्द शरद पवारांच्या मतदारसंघातून निवडून आलेल्या रणजित नाईक निंबाळकरांचे भाजपामध्ये सुरुवातीला खुपच कौतुक झाले. किंबहूना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमितभाई शहा यांच्याशी जवळीक करण्याची संधीही त्यांना मिळाली होती. मात्र, या संधीचे कोणीही फारसे सोने न करता वैयक्तिक मतलबावर भर दिल्याची चर्चा जनमानसात आहे.
यंदाची लढतही तुल्यबळ होणार
पाच वर्षाच्या काळात येरळामाई, माणगंगा, बाणगंगा, तसेच नीरा-भिमा खोर्यातून बरेच पाणी वाहून गेल्याने राजकीय समीकरणे बदलून होत्याचे नव्हते झाले आहे. निंबाळकरांना मताधिक्य देणारे अकलूजकर मोहिते-पाटलांच्या धैर्यशिल भैय्यांनी स्वत:च तुतारी घेवून मैदानात उतरणे पसंत केले आहे. तर गेल्यावेळी विरोधात निवडणूक लढवणारे आमदार संजयमामा शिंदे, त्यांचे बंधू आमदार बबनदादा शिंदे हे खासदारांचे प्रचारक बनले आहेत. या दोघांशिवाय सांगोल्याचे ‘काय झाडी, काय डोंगर’ फेम आमदार शहाजीबापू पाटील, पंढरपूरचे विधानपरिषदेचे आमदार प्रशांत पारिचारीक (मालक), पांडुरंग परिवाराचे कल्याणराव काळे, खटावचे माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकर हे खासदारांच्या तंबूत आहेत. तर माणचे आमदार जयकुमार गोरे (भाऊ) श्रीकृष्णाची भूमिका घेवून त्यांच्या रथाचे सारथ्य करत आहेत. तर फलटणकर रामराजे नाईक निंबाळकरांचे बंधू रघुनाथराजे नाईक निंबाळकर, पुत्र अनिकेतराजे हे उघडपणे तुतारी वाजवत आहेत. तर स्वत: रामराजे व अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी चुप्पीचे धोरण अवलंबले आहे. खटाव-माण मधून राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, काँग्रेस नेते रणजितसिंह देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिलभाऊ देसाई, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शेखरभाऊ गोरे यांच्यासह अजितदादा गटाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, सुरेंद्रदादा गुदगे यांनी मोहिते-पाटलांच्या पालखीला खांदा देण्याची भूमिका घेतली आहे. तर थकीत कर्जाचा बोजा दाखवून पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील (आबा) यांना सत्ताधारी भाजपाने ऐन रणांगणात पंक्चर केले आहे. अश्या परस्थितीत दोन्ही बाजूने प्रतिष्ठा पणाला लागल्याने निवडणूक तुल्यबळ होण्याची चिन्हे आहेत.
0 Comments