सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: वारसा हक्काने विश्वस्त बदलाच्या दोन प्रकरणात प्रत्येकी पाचशे अशी एक हजार रुपयांची लाच घेणारा लाचखोर लिपिक श्रीकृष्ण दामोदर पाथरे (वय 56) याला सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ पकडले. त्याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.
याबाबात माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार हे एक वकील असून त्यांच्याकडील अर्जदाराची वारसा हक्काने विश्वस्त बदलाची दोन प्रकरणे सहायक धर्मादाय आयुक्त सार्वजनिक नोंदणी न्यास कार्यालयात दाखल आहेत. सदर प्रकरणाबाबत चौकशीची जाहीर नोटीस काढण्याकरिता पाथरे याने तक्रारदाराकडे 1 हजार रुपयांची मागणी केली.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पडताळणीनंतर सापळा रचून सोमवारी पाथरेला रंगेहाथ ताब्यात घेतले. उपअधीक्षक राजेश वाघमारे, निरीक्षक सचिन राऊत, हवालदार गणेश ताटे, प्रशांत नलावडे, नाईक नीलेश चव्हाण, प्रियांका नाईक, अजित देवकर यांनी ही कारवाई केली.
धर्मादाय आयुक्त कार्यालय परिसरात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या कारवाईने एकच खळबळ उडाली.
0 Comments