सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मायणी: चितळी, ता. खटाव येथे मोहिते मळा परिसरात दोन चोरट्यांनी पाणी मागण्याच्या बहाण्याने 75 हजार रुपयांचे दोन तोळे दागिने लंपास केले. यावेळी चोरट्यांशी झालेल्या झटापटीत वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून दोघांनाही दहा ते बारा टाके पडले असून दोघांवर उपचार सुरु आहेत. ही घटना बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी, येथील चांगदेव मंदिराजवळ असलेल्या ढाब्याशेजारी नारायण सीताराम माने यांचे घर आहे. नारायण व त्यांची पत्नी राधा असे दोघेच रहातात. रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा वाजल्याने राधाबाई नारायण माने (वय 65) यांनी दरवाजा उघडला. दाराबाहेर असलल्या दोघांपैकी एकाने पाणी मागितले. त्या पाणी घेऊन बाहेर आल्या असताना एकाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील दागिने हिसकावले. त्या आरडा ओरडा करत असताना एकाने त्यांच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार केला. आरडाओरडा ऐकून राधाबाई यांचे पती नारायण माने हे देखील बाहेर येऊन चोरट्यांशी झटापट करू लागले. मात्र, चोरट्यांनी त्यांच्यावरही हल्ला करून घटनास्थळावून पळ काढला.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी भेट दिली. तसेच गंभीर जखमी असलेल्या माने दाम्पत्याची रुग्णालयात जाऊन चौकशी केली. याबाबात वडूज पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरु आहे.
दरम्यान, या सशस्त्र दरोड्यामुळे चितळी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
0 Comments