Ticker

6/recent/ticker-posts

भाषाशुद्धी ही आजच्या साहित्याची गरज, पत्रकार आनंद कुलकर्णी यांचे प्रतिपादन, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात


 सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

सातारा:  स्वातंत्र्यवीर सावकरांच्या भाषाशुद्धीची टिंगल केली गेली. मात्र, भाषाशुद्धी ही  आजच्या साहित्याची गरज आहे. तसेच इंग्रजीचा वापर म्हणजे औरस पुत्र मारून दत्तकपुत्र वाढवण्यासारखं आहे, असे प्रतिपादन पत्रकार व हिंदू महासभेचे नेते आनंद कुलकर्णी यांनी केले.
अखिल भारत हिंदू महासभा व स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंच, सातारा जिल्हा यांच्यावतीने आयोजित सावरक साहित्य संमेलाच्या अध्यक्षस्थानावरून कुलकर्णी बोलत होते. स्वागताध्यक्ष जगन्नाथ शिंदे  होते तर व्यासपीठावर हिंदू महासभेचे प्रमुख कार्यवाह अ‍ॅड. दत्तात्रय सणस, समन्वयक कार्यवाह संजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलकर्णी म्हणाले, सावरकरांचे साहित्य युगानुयुगे प्रेरणा देणारे, दिशा देणारे आहे. त्यांच्या साहित्यात समाजाचे प्रतिबिंब आहे. ते खर्‍या अर्थाने साहित्य असून त्याचे पायारण करणं गरजेचं आहे.
भक्ती करणं सोपं, अनुयायी होणं अवघड
सावरकरांविषयी बोलताना ते म्हणाले, सावरकरांचा एक तरी विचार अंगीकारण्याची गरज असून त्यांच्या विचारांचं कार्य करत असताना उपेक्षितांचं जीणं जगावं लागेल. सध्या समाजमाध्यमावर भक्त हा शब्द अतिशय लोकप्रिय असून सावरकरांची भक्ती करणं सोपं पण, अनुयायी होणं अवघड आहे. स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणणार्‍यांना तरी सावरकर समजले आहेत की नाही, अशी स्थिती आहे. एवढी हिंदुत्वाची व्याख्या बदलली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
सावरकरांचे विचार समजायला अवघड आहेत ते एका बाजूला झुकणारे नाहीत तर तराजूसारखे आहेत, हे सांगतानाच आम्हाला सावरकर विकृतपणे सांगितले गेले. त्यांचं हिंदुत्व विज्ञाननिष्ठ असून मानवता हा हिंदुत्वाचा मूळ गाभा आहे, ही सावरकरांची शिकवण होती. सावरकरांचे विचार वाचले पाहिजेत शिवाय काळाच्या कसोटीवर टिकणारे त्यांचे विचार आत्मसात केले तर सावरकरांचे अनुयायी घडतील, असे ते म्हणाले.
जगन्नाथ शिंदे यांनी सावरकर यांच्या जीवन कार्याचा व साहित्य लेखनाचा जाज्वल्य इतिहास विषद केला. रुपाली महाडिक यांनी सावरकरांची राजनीती आणि त्यांनी केलेले समाजसुधारणेचे कार्य मांडले. मोहन साठे यांनी सावरकरांच्या लेखनाचा आढावा घेतला.
सणस यांनी सावरकरांचे विचार तळागाळात पोचवण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. संजय कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले. अभिजित माने यांनी सावरकरांच्या अंदमानातील आठवणींना उजाळ दिला.
यावेळी विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटणवणार्‍या दहा मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अश्‍विनी माणिक कांबळे यांचा सावरकर गितांचा कार्यक्रम झाला. जयोस्तुते तसेच शिवछत्रपतींच्या आरतीला रसिकांनी दाद दिली.
हिंदू महासभेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनराज जगताप यांनी सूत्रसंचालन केले. युवा नेते उमेश गांधी यांनी आभार मानले.
संमेलन यशस्वी करण्यासाठी सुनील मोरे, सुनील घोलप, विलास पाटील, कुंभारदादा महाराज, मूलचंद ओसवाल, सत्वशीला  सणस, प्रिती गांधी, ट्विंकल ओसवाल, नितीन सणस, सुवर्णा जगताप यांनी परिश्रम घेतले.
सावरकर समजण्याची त्यांची बुद्धीच नाही
उपोषणाचा पुरस्कार करणारे गांधी गोळ्यांनी गेले तर गोळ्यांचा पुरस्कार करणारे सावरकर उपोषणाने गेले हा योगायोग आहे. शिवाय सावरकरांचे विचार कठोर होते. ते परिस्थितीने हतबल होणारे नव्हते, खचणारे नव्हते ते माफी मागूच शकत नाहीत. त्यांना माफीवीर म्हटल्याचं दु:ख नाही. कारण, सावरकर समजण्याची त्यांची बुद्धीच नाही, असा टोला त्यांनी नाव न घेता राहूल गांधी यांना उद्देशून लगावला.

Post a Comment

0 Comments