सातारा-लोणंद रस्त्यावर भीषण अपघात.... अंबवडे परिसरात घटना ; ट्रकने पेट घेतल्याने चालक जागेवर जळून ठार - - सत्य सह्याद्री

Monday, August 12, 2024

सातारा-लोणंद रस्त्यावर भीषण अपघात.... अंबवडे परिसरात घटना ; ट्रकने पेट घेतल्याने चालक जागेवर जळून ठार -

 

पिंपोडे बुद्रुक,दि.१२:
सातारा-लोणंद रस्त्यावर अंबवडे सं.वाघोली गावानजीक सोमवारी दि.१२ रोजी पहाटे साडेतीन वाजणेचे सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातानंतर ट्रकने पेट घेतल्याने चालक गाडीतच अडकला त्याला बाहेर पडता न आल्याने अक्षरशः जागेवरच जळून ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.अल्ताफ मन्सुरी, वय-२०, रा.भगोरा,ता. जिरापुर, जि.राजगड,(मध्यप्रदेश)असे दुर्दैवी चालकाचे नाव आहे. दुसरा चालक महेश दयानंद घुगे,वय-३७ हल्ली रा.गोकुळ शिरगाव,कोल्हापूर याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.तर दोन गंभीर पैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,लोणंद बाजूकडून ट्रक क्रमांक आर जे -१७-जी बी -६५६१ (इंदौर बॉडी ट्रक)हा कडप्पा फरशी भरलेला सातारच्या दिशेने चालला होता. तर आयशर ट्रक क्रमांक एम एच -इ जी -७७७५ हा मालट्रक सातारा बाजूकडून लोणंदच्या दिशेने निघाला होता. आंबवडे चौक ते पिंपोडे खुर्द गावांच्या दरम्यान पेट्रोल पंपानजिक दोन्ही वाहने आल्यावर त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. त्यामध्ये कडप्पा भरलेल्या ट्रकचा चालक अल्ताफ मन्सूरी हा जखमी अवस्थेत अडकला होता. धडक इतकी भीषण होती की ट्रकच्या केबिनने पेट घेतला. त्या स्थितीत ट्रकचा जखमी झालेला क्लिनर मांगीलाल रामप्रसाद भोल याने जखमी चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.मात्र त्याला अपयश आहे. मांगीलालच्या डोळ्या समोर चालकाचा गाडीच्या आगीत जळून मृत्यू झाला.
आयशर ट्रकच्याही केबिनचा पूर्ण चक्काचूर झाला असून त्याचा चालक महेश दयानंद घुगे हा गंभीर जखमी झाला होता.त्याला वाठार स्टेशन पोलिसांनी तातडीने उपचारांसाठी शासकीय रुग्णालय सातारा येथे दाखल केले.मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच साधारण चार वाजणेचे सुमारास वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे सपोनि अविनाश माने कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. ट्रकला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाशी संपर्क करण्यात आला. वाई येथून अग्निशमनची गाडी आल्यावर आग विझवण्यात यश आले तो पर्यंत आग लागलेल्या ट्रकची केबिन पूर्णतः जळून खाक झाली होती.
जखमी क्लिनर मांगीलाल रामप्रसाद भोल,रा.स्वायादिप पुरा, जि.आगरमालवा(मध्यप्रदेश)दुसरा जखमी क्लिनर उदय आबाजी पाटील, रा.कन्हेरी मठ,कोल्हापूर यांच्यावर सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.अपघाताची नोंद वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सपोनि माने करीत आहेत.

No comments:

Post a Comment