Ticker

6/recent/ticker-posts

जनतेने निवडलेले सरपंचच जनतेने घरी पाठवले, अपशिंगे सरपंच तुषार निकम अविश्वास ठरावात पराभूत

 


अपशिंगे

“ज्यांना जनतेने थेट मतदानातून निवडून दिले, त्यांनाच आज जनतेने मतदानातून नाकारले” — अशी स्थिती सातारा तालुक्यातील अपशिंगे ग्रामपंचायतीत दिसली. बॅलेट पेपरद्वारे झालेल्या विश्वासदर्शक ठरावात विद्यमान सरपंच तुषार निकम यांना ग्रामस्थांनी पराभूत करत घरी पाठवले. थेट निवडून आलेल्या सरपंचावरील हा जिल्ह्यातील पहिलाच अविश्वास निकाल ठरला आहे.

हुकूमशाहीविरोधात ग्रामस्थ एकवटले

अडीच वर्षांपूर्वी निकम यांनी थेट निवडणुकीत निसटता विजय मिळवत सरपंचपद पटकावले होते. मात्र, कार्यकाळात जुन्या योजनांची अवहेलना, गावातील सुविधा आणि इमारतींचे दुर्लक्ष, तसेच हुकूमशाही पद्धतीची कार्यशैली यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली. एक महिन्यापूर्वी ग्रामपंचायत सदस्यांनी बाळोबा मंदिरात बैठक घेऊन निकम यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याचा निर्णय घेतला होता.

मतदानातून उमटला रोष

ग्रामपंचायत प्राथमिक शाळेत सहा बूथवर आज सकाळपासून मतदान पार पडले. एकूण ३,३९१ मतदारांपैकी १,९०७ मतदारांनी मतदान केले. त्यापैकी १,०६३ मते अविश्वास ठरावाच्या बाजूने पडली, तर केवळ ८०७ मते निकम यांच्या बाजूने पडली. २५६ मतांच्या फरकाने त्यांना गादीवरून खाली उतरावे लागले.

ऐतिहासिक निकाल

जिल्ह्यातील थेट निवडून आलेल्या सरपंचांवरील हा पहिला अविश्वास ठराव आहे. संपूर्ण प्रक्रिया बीडीओ निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडली. तरुण, वृद्ध तसेच अपंग नागरिकांनी मोठ्या उत्साहाने मतदान करून आपला सहभाग नोंदवला.

ग्रामस्थांनी मतदानातून स्पष्ट संदेश दिला आहे की “गावाच्या विकासासाठी कार्य न करणाऱ्याला जनता घरी बसवू शकते.” या निकालानंतर अपशिंगे ग्रामपंचायतच्या पुढील नेतृत्वाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments