महाबळेश्वर :-
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक नासीर मुलाणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नगरपरिषद सभागृहात पार पडलेल्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया शांततेत व एकमताने पार पडली.
या वेळी नगरपरिषदेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठीही निवडी जाहीर करण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी नगराध्यक्ष किसनशेठ शिंदे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच महाबळेश्वर नगरविकास आघाडीकडून चार्टर्ड अकाउंटंट मिलिंद ढेबे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड जाहीर करण्यात आली.
या संपूर्ण निवड प्रक्रियेत पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी अधिकृतरीत्या निवडी जाहीर केल्या. तर निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी सर्व प्रक्रिया नियमांनुसार पार पाडली.
उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नासीर मुलाणी यांनी सभागृहातील सर्व नगरसेवकांचे आभार मानत, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. शहरातील नागरी सुविधा, पर्यटन विकास, पायाभूत सोयी-सुविधा तसेच नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम केले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
या निवडीमुळे महाबळेश्वर नगरपरिषदेतील राजकीय समीकरणांना स्थैर्य मिळाल्याचे चित्र असून, आगामी काळात शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0 Comments