Ticker

6/recent/ticker-posts

जयकुमार गोरे यांची कुरोलीतील सभा ठरली विकासाचे वादळ निर्माण करणारी

सत्य सह्याद्री
औंध प्रतिनिधी
औंध: औंध जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कुरोली येथे आयोजित करण्यात आलेली जयकुमार गोरे यांची सभा विकासाचे वादळ निर्माण करणारी ठरली. जयकुमार गोरे यांनी औंधसह एकवीस गावांचा शेती पाण्याचा मुद्दा, कुरोलीचा 'ब' वर्ग पर्यटन मध्ये समावेश करणे, औंध गटाचा विकास या मुद्द्यांवर भाष्य केले. जयकुमार गोरे यांच्या सभेतील संबोधनातून विकासदृष्टीचा सन्मान करणाऱ्या, पाणीप्रश्नावर ठाम भूमिका मांडणाऱ्या आणि दूरदृष्टीचा विचार पुढे नेणाऱ्या नेत्याच्या झंझावाती कारकिर्दीचे दर्शन घडले.
        औंध गटाच्या उमेदवार भारतीताई अंकुश गोरे, औंध गणाचे उमेदवार दादासाहेब इंगळे आणि सि. कुरोली गणाचे उमेदवार शहाजी देशमुख यांच्या प्रचारार्थ ही सभा पार पडली. सभेला परिसरातील ग्रामस्थ, महिला, ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते व युवकांची मोठी उपस्थिती होती. सभेत औंधमधील सामाजिक कार्यकर्ते व माजी सैनिक धनाजी आमले यांनी औंधसह एकवीस गावांच्या शेती पाण्याच्या प्रश्नावर विरोधकांनी केलेल्या राजकारणावरून जोरदार हल्लाबोल केला. शेती पाण्याच्या मुद्द्यावर गेल्या अनेक वर्षांत झालेले राजकारण, दुर्लक्ष आणि विरोधकांकडून जनतेची करण्यात आलेली दिशाभूल यावर त्यांनी थेट बोट ठेवले. उमेदवार भारतीताई गोरे यांनी आपल्या भाषणामध्ये आपले विकासात्मक धोरण मांडताना सांगितले की, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सक्षम नेतृत्वात आणि अंकुश भाऊ गोरे यांच्या खंबीर साथीने भारतीय जनता पार्टीचा विकासरथ औंध गटात अधिक वेगाने पुढे नेण्यात येईल. आपल्या सर्वांच्या साथीने औंध गटाचा चेहरा मोहरा आपल्याला बदलायचा आहे. शिक्षण, आरोग्य, महिलांचे सक्षमीकरण, उद्योग क्षेत्रामध्ये बदल घडवून आणायचे आहेत त्यामुळे औंध गटाच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची साथ द्या असे भारतीताईंनी आवाहन केले.
        सभेसाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे महाराष्ट्राच्या ग्रामविकास व पंचायतराज खात्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना प्रथम माण–खटावच्या जनतेचे हात जोडून आभार मानले. “चार वेळा आमदार म्हणून निवडून दिले आणि आज हा माण खटावचा सुपुत्र महाराष्ट्राच्या ग्रामविकास व पंचायतराज मंत्रिपदी विराजमान झाला आहे आणि तुमचे ऋण मी कधीही विसरणार नाही,” असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेअंतर्गत येणारी बहुतांश कामे आपल्या खात्याशी संबंधित असल्याचे नमूद करत विरोधकांना खोचक सवाल केला. “निवडून येऊन निधी मागायला कोणाकडे जाणार आहत ? निधी देणारा मीच आहे” असे म्हणून सूचक इशारा दिला. सि. कुरोलीला येत्या दोन महिन्यांमध्ये 'ब' वर्ग दर्जा देत असून पाच कोटींचा निधी त्यानंतर उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले. माण–खटावचा भाग दीर्घकाळ दुर्लक्षित राहिला होता; मात्र आता परिस्थिती बदलत आहे. पाणी येत आहे, शेती सुधारत आहे, विकासकामांना गती मिळत आहे. “पुढील निवडणूक पाणीप्रश्नावर लढावी लागणार नाही,” असा विश्वास व्यक्त करत त्यांनी स्पष्ट केले की औंधसह एकवीस गावांसाठी पाणी आरक्षित केले आहे आणि तीन वर्षांत पाणी आणून दाखवण्याचा शब्द मी आपणास दिला आहे. “आज टेंडर किंवा निधीवर बोलणार नाही; मात्र पाणी प्रत्यक्ष येईपर्यंत मी शांत बसणार नाही, पाणी आणून दाखवणारच” असे ठाम आश्वासन त्यांनी दिले. येत्या चार पाच दिवसांमध्ये राज्यपालांची मंजुरी होत आहे. सांगितलेल्या वेळेत पाणी औंधसह एकवीस गावात पोहोचलेले असेल असे गोरे म्हणाले. 
         विरोधकांवर टीका करताना त्यांनी सांगितले की, काहीजण पैशाच्या जोरावर निवडणूक लढत आहेत; पण भाजपची ताकद वेगळी आहे. “कुक्कुडवाड, मायणी ते निमसोडपर्यंत अनेक नेते भाजपमध्ये यायला उत्सुक होते. हेच भाजपच्या विकासाचे चित्र आहे,” असे म्हणत त्यांनी पक्षाची वाढती ताकद अधोरेखित केली.
शेवटी भावनिक आवाहन करताना जयकुमार गोरे म्हणाले, “तुम्ही फक्त उमेदवारांना नव्हे, तर मला निवडून देत आहात. या मातीत जन्मलेला सुपुत्र या मातीसाठीच लढणार आहे. या भागाचा कायापालट झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. एक दिवस असा येईल की बारामतीचे लोकही माण खटावला स्थळे शोधायला येतील.” त्यामळे विकासाचे पर्व सुरू करण्यासाठी आणि औंध गटाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीला निवडून आणण्याचे आवाहन जयकुमार गोरे यांनी केले आणि सभेची सांगता झाली. सभा संपताना उपस्थितांमध्ये उत्साह, विश्वास आणि विकासाबाबतची नवी क्षितिजे खुली झाल्याची भावना पाहायला मिळाली. 

हो भारतीताई माझ्या घरातील आहेत 

घरातील उमेदवार दिल्याच्या सतत होणाऱ्या टिकेला जयकुमार गोरेंनी कुरोली मधील जाहीर सभेत उत्तर दिले. हो भारतीताई माझ्या घरातील आहेत, पण त्या तुमची सर्व कामे करतील. औंध गटाला विकासाची नवी उंची देतील. अंकुश भाऊंची आणि माझी त्यांना साथ आहे. मला राज्यात ग्रामविकास खाते सांभाळताना मतदार संघात पूर्ण वेळ देता येत नाही त्यासाठी सोनियाताई चोवीस तास सक्रिय आहेत. तुम्ही केव्हाही फोन करा काम होणार.

Post a Comment

0 Comments