Ticker

6/recent/ticker-posts

जिल्ह्यात जुगार अड्ड्यांवर धाडीचे सत्र


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

सातारा: नव्याने पदभार स्वीकारताच पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात जुगार अड्ड्यांवर धाडसत्र सुरु झाले असून विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांत एकूण २ लाख ४८ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येऊन संशयितांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

 शाहूपुरीत दोन ठिकाणी छापे

शाहूपुरी परिसरातील राजवाडा भागातील अळूचा खड्डा येथे टपरीच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून ९०० रुपये व साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी अनिल लक्ष्मण वाघमारे (रा. गुरुवार पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या कारवाईत बस स्थानकासमोरील बाजार समिती पटांगणाजवळील बोळात छापा टाकण्यात आला. येथे ६,२१४ रुपये रोख व साहित्य जप्त करण्यात आले. संतोष जनार्दन शेळके (रा. शेळकेवाडी), सुनील नारायण अवघडे (रा. सैदापूर) व सोमनाथ चोरगे (रा. रविवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

परळी येथे मोठी कारवाई

परळी गावाच्या हद्दीत पडक्या घराच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून १ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

यात मोबाईल, आयफोन, लॅपटॉप, दूरचित्रवाणी संच व दुचाकींचा समावेश आहे. प्रतीक शंकर जाधव (रा. आंबवडे बुद्रुक) व सोमनाथ भानुदास मनवे (रा. मनवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

 जकातवाडी व नागेवाडीतील कारवाई

जकातवाडी येथे मोकळ्या शेडमध्ये सुरु असलेल्या अड्ड्यावर छापा टाकून ७८ हजार ३२० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. अभिजीत अशोक चौगुले व गणेश चंद्रकांत कुऱ्हाडे (दोघेही रा. मंगळवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

नागेवाडी येथे दत्तकृपा गॅरेजच्या पाठीमागे सुरु असलेल्या अड्ड्यावर छापा टाकून ७६० रुपये व साहित्य जप्त करण्यात आले. निळकंठ शिवाजी सावंत (रा. नागेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला.

 गुरुवार पेठेत धाड

गुरुवार पेठ परिसरात सलून दुकानाजवळील शेडमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून १,१५० रुपये रोख व साहित्य जप्त करण्यात आले. मनोज संपतराव माने (रा. गुरुवार पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी एकाच दिवशी कारवाया करत कडक संदेश दिला आहे. पुढील काळातही अशीच धडक मोहीम सुरु राहणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.

नूतन पोलीस अधीक्षकांचा दणका

नूतन पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी पदभार स्वीकारताच जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर धडक मोहीम सुरु केली आहे. चक्री, मटका व जुगार अड्ड्यांवर सलग छापेमारी करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा, शहर पोलीस, तालुका व शाहूपुरी हद्दीत सुरू असलेले अनेक अड्डे बंद करण्यात आले आहेत.

चक्री व्यवसायावर पूर्णपणे आळा घालण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अवैध व्यवसायासाठी उभारण्यात आलेल्या टपऱ्यांवरही कारवाई होणार असून पालिका हद्दीत अशा बांधकामांचे पाडकाम करण्याची तयारी सुरु आहे. अवैध गाळेधारकांना नोटिसा देण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध व्यवसाय चालवणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काळातही अशीच कडक कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.


Post a Comment

0 Comments