सातारा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारणीसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या आमने बंगल्याच्या प्रकरणाला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या संदर्भात प्रशासनाला सकारात्मक तोडगा काढण्याचे स्पष्ट निर्देश देत संबंधितांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन केले.
राज्य सरकारने आमने बंगला हा राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल्यानंतर या स्थळाचे ऐतिहासिक महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबीयांचे वास्तव्य या ठिकाणी असल्याने येथे स्मारक उभारणीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत मंत्री भोसले यांनी आमने कुटुंबाचे हक्क अबाधित ठेवत बाजारभावानुसार न्याय्य नुकसानभरपाई देण्यावर भर दिला. “स्मारक उभारणी ही सर्वांची भावना आहे; मात्र यासाठी तडजोडीचा मार्ग स्वीकारणे गरजेचे आहे. संबंधितांनी न्यायालयीन प्रक्रिया थांबवून सकारात्मक भूमिका घ्यावी,” असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले की, भूसंपादन प्रक्रियेदरम्यान आमने यांनी न्यायालयात धाव घेतली असून सध्या उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयात प्रकरणे प्रलंबित आहेत. राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मान्य करून न्यायालयीन निर्णयाला अंतिम मान्यता देण्याचा पर्याय सध्या विचाराधीन असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, आमने कुटुंबानेही बाजारभावानुसार नुकसानभरपाई आणि पर्यायी जमीन मिळाल्यास न्यायालयीन प्रकरणे मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. प्रशासन आणि सरकारी वकिलांबरोबर झालेल्या चर्चेत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, या दीर्घकालीन प्रश्नावर लवकरच ठोस निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

0 Comments