Ticker

6/recent/ticker-posts

महाबळेश्वरसह परिसरात पावसाचा जोर कायम

सत्य सह्याद्री डिजिटल 
भेकवली 
महाबळेश्वरसह परिसरात पावसाचा जोर कायम असून, येथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. लिंगमळा धबधब्याकडे जाणारा रस्ता दि. ६ जुलै रोजी भेकवली गावानजीक रस्ता खचला असून, झाड पडल्यामुळे मार्ग बंद झाला आहे. विशेष म्हणजे अतिवृष्टीत २०२१ मध्ये ज्या ठिकाणी रस्ता खचून वाहतूक विस्कळीत झाली होती, त्याच ठिकाणी आता रस्ता खचल्याने व झाड उन्मळून पडल्याने वाहतूक बंद झाली आहे. भेकवली गावाहून लिंगमळा धबधब्याकडे जाणाऱ्या ब्रिटिश कालीन रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून, रस्ता रुंदीकरण आणि गटारांच्या अभावामुळे स्थानिकांसह पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी आणि जीर्ण पुलांची झालेली दुरवस्था पाहता, भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने वेळीच दखल घेणे आवश्यक बनले आहे.२०२१ मध्ये रस्ता खचल्यानंतर प्रशासनाने तात्पुरता उपाय म्हणून त्यावेळचे गटार काढून रस्ता दुरुस्त केला होता. मात्र, त्यानंतर करण्यात आलेला तात्पुरता रस्ता हा केवळ 'सिंगल लेन' आहे. लिंगमळा धबधब्यामुळे पर्यटकांची वाढती संख्या आणि स्थानिक रहदारी लक्षात घेता, या चिंचोळ्या रस्त्यावरून दुहेरी वाहतूक होणे अशक्य झाले आहे. एका वेळी एकाच बाजूची वाहने जाऊ शकत असल्याने, समोरून दुसरी गाडी आल्यास वाहतूक कोंडी होऊन अर्धा-अर्धा तास वाहने अडकून पडत आहेत. हा रस्ता पूर्णपणे बायपास करून त्याचे गटारांसह रुंदीकरण करणे ही गरज बनली आहे.या मार्गावरील सर्व पूल हे ब्रिटिश कालीन असून ते दगडी आणि अत्यंत जीर्ण झाले आहेत. वेण्णा लेक येथील सुमनराज पूल कोसळल्याची घटना ताजी असताना, लिंगमळा मार्गावरील पुलांचीही तीच अवस्था असल्याचे दिसून येत आहे. या पुलांची तातडीने पाहणी करून दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी न केल्यास मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.पावसाच्या पाण्यासाठी योग्य गटार व्यवस्था नसल्यामुळे रस्त्याच्या वरच्या बाजूची माती मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे. या मातीच्या धूपीमुळे मार्गावरील झाडेदेखील सरकली असून रस्त्याला धोका निर्माण झाला आहे.सदर रस्ता नगरपालिकेच्या अखत्यारित येत असून, सध्या प्रशासकीय राजवटीऐवजी लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवक कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, महाबळेश्वरचे विद्यमान नगराध्यक्ष सुनील शेठ शिंदे हे याच भागातील माचुतर गावचे सुपुत्र आहेत. त्यामुळे स्थानिकांच्या समस्यांची त्यांना पूर्ण जाणीव असून, ते स्वतः या प्रकरणात जातीने लक्ष घालून लिंगमळा रोडचा प्रश्न मार्गी लावतील आणि भविष्यातील संभाव्य धोका टळेल, अशी अपेक्षा या भागातील नागरिक व्यक्त करत आहेत.

Post a Comment

0 Comments