१३ ऑगस्टला खोदलेला खड्डाही अद्याप बुजवला नाही; विरोध करणाऱ्या नागरिकांना गुन्ह्यांची धमकी दिल्याचा आरोप
सातारा | सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा शहरातील करंजे नाका ते म्हसवे रस्त्याचे काम अवघ्या दीड महिन्यापूर्वी पूर्ण झालेले असताना आता हाच नव्याने तयार झालेला रस्ता पुन्हा खोदण्याचा घाट घातला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. जिल्हा समादेशक (होमगार्ड) विभागाला दोन इंची पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ता खोदण्याची परवानगी जानेवारीतच घेण्यात आली होती. मात्र, त्यावेळी खोदकाम न करता आता रस्ता नव्याने तयार झाल्यानंतर खोदकाम करण्याचा निर्णय का घेतला जात आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दि. १३ ऑगस्ट रोजी नव्याने तयार झालेल्या रस्त्यावर खोदकाम सुरू करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी त्याला तीव्र विरोध केल्यानंतर काम थांबविण्यात आले. खोदलेला खड्डा पुन्हा बुजविण्याची मागणी केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी त्यास मान्यता दिल्याचे सांगण्यात आले; मात्र, अद्यापही हा खड्डा पूर्णपणे बुजविण्यात आलेला नाही. त्यातच आता संबंधित अधिकाऱ्यांकडून पुन्हा रस्ता खोदण्यासाठी परवानगी घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
नवीन रस्ता तोडायचाच कशासाठी?
रस्ता बांधताना पाणीपुरवठ्याची कामे आधीच का पूर्ण करण्यात आली नाहीत? जानेवारीत परवानगी घेतल्यानंतरही त्यावेळी काम न करता रस्ता पूर्ण झाल्यावरच खोदकाम करण्याची वेळ का आली? सार्वजनिक निधीतून नुकताच तयार केलेला रस्ता पुन्हा खोदून त्याच्या गुणवत्तेचे नुकसान करण्यास परवानगी कोण देत आहे? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने देणे गरजेचे आहे.
दरम्यान, पिलेश्वरी नगर आणि जिल्हा परिषद वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनमधून होमगार्ड विभागाकडून दोन इंची जोडणी घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या जोडणीमुळे मुख्य पाणीपुरवठा व्यवस्थेवर परिणाम होऊन दोन्ही वसाहतींमधील नागरिकांच्या नियमित पाणीपुरवठ्यावर गदा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नागरिकांचा सवाल : ‘सरकारी काम’ म्हणजे मनमानीला परवाना?
जागरूक नागरिकांनी रस्ता खोदण्यास विरोध केल्यानंतर त्यांना ‘शासकीय कामात अडथळा आणल्यास गुन्हे दाखल केले जातील,’ अशी धमकी दिली जात असल्याचा आरोप काही नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी प्रश्न उपस्थित करणे हा गुन्हा ठरू शकत नाही.
नुकताच तयार झालेला रस्ता पुन्हा खोदण्यास तसेच मुख्य पाणीपुरवठा वाहिनीतून नवीन जोडणी देण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पालिका व संबंधित शासकीय यंत्रणांनी तातडीने पाहणी करून निर्णय घ्यावा आणि सार्वजनिक निधीतून झालेल्या रस्त्याची पुन्हा नासधूस होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

0 Comments